दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
पाचगणी येथील रहिवासी असलेल्या नितीन रमेश फणसे याने एकाला भर रस्त्यात अडवून त्याला जबर मारहाण केली व खिशातून जबरदस्तीने ८६० रुपये चोरले, या खटल्यात न्यायालयाने फणसे याला दोषी ठरवून त्याला १ वर्षाची सक्तमजूरी व तब्बल १० हजारांचा दंड ठोठावला.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, पाचगणीत हा प्रकार घडला. फणसे हा प्रमोद शेलार या व्यक्तीच्या खिशातून ८६० रुपये घेऊन पळून गेला व त्याने जबर मारहाण केली होती. त्यावरून पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली. पाचगणीचे सहायक निरीक्षक सतीश पवार यांनी फौजदार अरविंद माने यांना सूचना करून फणसे याला ताब्यात घेतले. फौजदार महामुलकर, सहाय्यक फौजदार बाबर यांनी या घटनेचा तपास केला.
या खटल्याची सुनावणी महाबळेश्वर येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. बहुलकर यांनी युक्तीवाद केला. यामध्ये दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने वरील शिक्षा ठोठावली. यामध्ये दंड न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षास या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिसांतर्फे पोलिस कॉन्स्टेबल श्री. कुंभार, हवालदार श्री. वझे, शेळके यांनी सहकार्य केले.