राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची वर्णी लागत होती. यावेळी मात्र भाजप-शिंदे सरकारने थेट आजी-माजी आमदारांना या समितीवर नेमले आहे. आगामी काळात राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी ही व्यूहरचना मानली जात आहे.
राज्याच्या नियोजन विभागाचे सचिव संजय धुरी यांनी यासंदर्भातील आदेश काल जारी केला असून यामध्ये आमदारांमधून भिमराव तापकीर व राहूल कुल यांची नियुक्ती नामनिर्देशित सदस्य म्हणून केली आहे.
तर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या नामनिर्देशित सदस्यांकरीता माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते गणेश बिडकर, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची नियुक्ती केली आहे.
तर जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये माजी आमदार संजय भेगडे, भगवान पोखरकर, वासुदेव काळे, आशा बुचके, राहूल पाचर्णे, जीवन कोंडे, भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडूरंग कचरे, विजय फुगे, काळूराम नढे, प्रविण काळभोर, योगेश टिळेकर, शरद हुलावळे, अलंकार कांचन, अमोल पांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.