शिरूर – महान्यूज लाईव्ह
माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे सुपुत्र राहुल पाचर्णे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली आहे. या निवडीने शिरूर तालुक्यात भाजपला पुन्हा मोठे बळ मिळणार आहे.
राहुल पाचर्णे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून शिरूर ग्रामीण निमोणे या जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. मागील वर्षी राहुल पाचर्णे यांचे वडील माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले होते.
भारतीय जनता पक्षामध्ये पाचर्णे यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बाबुराव पाचर्णे यांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच राहुल पाचर्णे हे देखील काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत.
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस हे शिरूर येथे आले असताना राहुल यांना आगामी काळात बळ देतील असे सांगण्यात आले होते. तसेच शिरूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून राहुल यांच्यासाठी बळ देण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावर राहुल यांची निवड झाल्याने शिरूर शहर व पंचक्रोशीत पाचर्णे यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात काम करण्याची मोठी संधी मिळणार असून या माध्यमातून आगामी काळात विकासकामे करता येणार असल्याचे राहुल यांनी बोलताना सांगितले.