राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाढते गुन्हे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी यवत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यात होण्यासाठी सुप्रियाताई पुढाकार घ्या, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या आणि पाटस पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत पाटस पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवंड ला पोलीस चौकी होवी अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे केली होती.
मात्र सुप्रियाताईंनी मागील कित्येक वर्षापासून गृह विभागाकडे पाटस पोलीस ठाण्याचा प्रस्ताव धुळ खात पडला आहे, तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मागील दहा ते पंधरा वर्षापासून यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस दूरक्षेत्र हे पोलीस स्टेशन होवे अशी मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मात्र पाटस पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला नाही. या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले असा आरोप यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक करीत आहेत. सध्या पुन्हा एकदा नव्याने पाटस येथे पोलीस ठाणे होण्यासाठी व पाटस पोलीस स्टेशन अंतर्गत कोणकोणती गावी असावीत, पाटस पोलीस स्टेशनची हद्द, अशा अनेक भौगोलिक परिस्थितीचा अहवाल गृहविभागाकडे पाठवण्यात आला आहे.
वरवंड या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी याबद्दल दुमत नाही, मात्र पाटस या ठिकाणी पोलीस ठाणे होणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाढती गुन्हेगारी, घरफोडी, चोरी खुन आदी घटना पाहता यवत पोलीस ठाण्यात पुरेसा प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची उपलब्धता नाही.
यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पाटस व केडगाव असे दोन पोलीस दुरक्षेत्र आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात आहे त्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० गावांचा समावेश आहे. सध्या ७ पोलीस अधिकारी व ८२ पोलीस कर्मचारी यवत पोलीस ठाण्यात कामकाज पाहत आहेत.
त्यापैकी पाटस व केडगाव पोलीस चौकीला प्रत्येकी १० पोलीस कर्मचारी कामकाज पाहत आहेत. अशा अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर यवत पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. पाटस पोलीस ठाणे झाल्यास व यवत पोलीस ठाण्याचे विभाजन झाल्यास गृह विभागाचा वाढता ताण कमी होणार आहे. तसेच दौंड तालुक्यातील वाढते गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाटस पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे तसा अहवालही स्थानिक पोलीस प्रशासनाकडून गृह विभागाला पाठवण्यात आला आहे.