विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामती – तो बारामतीतील मोतीबागेत एका गॅरेजमध्ये काम करतो.. गॅरेजमध्ये काम करताना त्याला व्यायामाचा छंद जडला..आणि कालपरवा पुण्यात झालेल्या २०२३ पुणे श्री स्पर्धेत शरिरसौष्ठव स्पर्धेत तो विजेता ठरला..!
बारामतीतील संजय बेहरा या शरिरसौष्ठवपटूने पुण्यात झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली कमाल दाखवली. फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे अंतर्गत १६५ सेमी.उंची खालील वजनी गटामध्ये घेण्यात आलेल्या मिस्टर पुणे श्री २०२३ या स्पर्धेत तो विजेता ठरला.
बारामती मधील मोतीबाग येथे गॅरेजमध्ये वाहनांच्या डेंटींग, पेंटींगचे काम संजय करतो. गॅरेजमध्ये काम करतानाच त्याला व्यायामाचा छंद जडला. सन २०१५ पासून त्याने आपल्याला शरीर बनवायचेच आहे असे मनाशी ठामपणे पक्के केले आणि बारामतीतील ईलाईट जिम येथे व्यायामाला सुरवात केली.
सुरवातीला स्वतःच तयारी केली. गेल्या दोन वर्षांपासून प्रशिक्षक भूषण कांबळे यांनी त्याची तयारी करून घेण्यास सुरवात केली. जीमचालक पंकज झेंडे यांनीही सहकार्य केले. शनिवारी पुण्यात शरीरसौष्ठवाची ही स्पर्धा पार पडली.
संजय आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्याच स्पर्धेत उतरला आणि यशस्वीदेखील झाला. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा पुणे श्री चा तो मानकरी ठरल्याने साहजिकच त्याचे कौतुक होतेय, अर्थात कोणतीही परिस्थिती झेप घेणाऱ्यांना अडवून ठेवू शकत नाही हेच त्याच्या या यशोगाथेतून दिसून येते.