बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी चोरलेल्या दुचाक्यांपैकी १६ दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सहा तालुक्यांमध्ये त्यांनी या दुचाक्या चोरल्या. हे पाचही जण आता अवघ्या २० वर्षांचे आहेत हे विशेष!
बारामती तालुका पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने या आधी अशाच प्रकारे 27 दुचाक्या चोरांकडून हस्तगत केल्या होत्या. १३ जानेवारी रोजी गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे व पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे हे बारामती एमआयडीसी,सूर्यनगरी परिसरामध्ये गस्त घालत होते.
त्यावेळी त्यांना आकाश संतोष नरूटे (वय -20 वर्ष राहणार लालपुरी कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे) हा सूर्यनगरी बारामती परिसरात संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा तो असंबध्द उत्तरे देऊ लागला.
त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला. मग त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाक्या चोरण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे साथीदार 1 कौस्तुभ राजू गावडे (वय 20 वर्ष राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे), 2 प्रथमेश तुकाराम पवार (वय 20 वर्ष राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर), 3 सोहन संतोष साठे (वय 20 वर्ष राहणार माढा जिल्हा सोलापूर) व रोहित सुभाष घोडके (वय 20 वर्ष राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांची नावे सांगितली.
या पाच जणांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून उघड झालेल्या चोऱ्यांमध्ये बारामती, पुणे, हांडेवाडी, सातारा, शिंगणापूर, दहिवडी, टेंभुर्णी ,सोलापूर ,देवाची उरुळी, लोणंद ,मोहोळ . अशा विविध गावातून व शहरातून चोरलेल्या दुचाक्यांचा समावेश आहे.
नरुटे वगळता इतरांना वडाळा सोलापूर येथून चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या सर्वांकडे केलेल्या चौकशीमध्ये वरील सर्व ठिकाणावरून गाड्या चोरल्याचे निदर्शनात आले, त्यावरून त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून तब्बल 16 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या.
न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली असून त्यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिसांकडे ४, सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात २, लोणंद व मोहोळ पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान या पाच जणांनी आणखीही चोरीचे गुन्हे केले असण्याचा पोलिसांना संशय असून तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे व दीपक दराडे, सहायक फौजदार कोलते पुढील तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार कोलते, हवालदार राम कानगुडे, महिला पोलीस हवालदार आशा शिरतोडे. पोलीस नाईक अमोल नरुटे, बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी यांनी केली