दौंड : महान्यूज लाईव्ह
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आज दौंड शहरात एका कार्यक्रमासाठी येणार होते मात्र संभाजी भिडे दौंड शहरात येणार असल्याची वार्ता समजताच दौंड शहरातील बौद्ध संघटना आक्रमक झाल्या आणि भिडेंना तीव्र विरोध दर्शवत संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर भिडे यांनी आज दौंड शहरात यायचं टाळलं. त्यांचा गाड्यांचा ताफा थेट बारामतीकडे रवाना झाला.
संभाजी भिडे यांच्या नियोजित बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवण्याची शक्यता निर्माण झाल्याने अतिरिक्त पोलिसांची कुमक शहरात बोलवण्यात आली होती. स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे परिस्थितीवर दिवसभर लक्ष ठेवून होते. शहरांमध्ये अतिरिक्त 100 पोलीस जवानांचा फौजफाटा बोलवण्यात आला होता.
आंबेडकरी चळवळीच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी संभाजी भिडे यांनी दौंडचा दौरा रद्द केला. त्यांच्या वाहनांचा ताफा थेट बारामतीकडे रवाना झाला. त्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका व शहर यांनी मंगळवारी (दि.१७) एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील विठ्ठल मंदिरात सायंकाळी पाच वाजता संभाजी भिडे अशा प्रकारचे नियोजन देखील केलं होतं. मात्र दुसरीकडे संभाजी भिडे यांचे दौंड शहरात आगमन होणार असल्याची वार्ता समजताच शहरातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि बौद्ध संघटना आक्रमक झाल्या.
वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, ऑल इंडिया दलित पॅंथर , भीम क्रांती सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदींसह विविध संघटनांनी भिडे यांच्या कार्यक्रमास तीव्र विरोध दर्शविला. भिडे हे समाजात जातीय तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप या संघटनांनी केला. पोलिसांनी संभाजी भिडे यांचा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावू असा इशाराही या संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिला.
त्यानंतर संध्याकाळी नियोजित पाचच्या कार्यक्रमास संभाजी भिडे उपस्थित राहणार नसल्याची माहिती धारकऱ्यांना मिळाली आणि धारकऱ्यांनी शिवाजी चौकात येऊन अभिवादन केले. यानंतर संविधान चौकात देखील आंबेडकरी चळवळीच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
दरम्यान यावेळी संभाजी भिडे यांनी दौंड शहरात येणे टाळले. हे एका अर्थी बरे झाले, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला झाला असता अशा प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.