रामभाऊ जगताप, सांगवी
ग्रामविकास आणि गावगाड्यातील समस्यांवर फक्त आश्वासनांची मलमपट्टी न करता त्यावर कायमचा तोडगा काढण्याचे काम बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील रविराज तावरे (लाखे) यांनी केले. रस्त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण होत असताना वाहनचालकांना रविराज तावरे यांच्या पुढाकारामुळे नवीन जागा मिळाली.
माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे भाडेतत्त्वावर चालणारी तब्बल ४० ते ५० च्या आसपास खाजगी वाहने आहेत. येथील वाहनांचे शनी मंदिराच्या परिसरात वाहनतळ होते. परंतु माळेगावातून नव्याने होत असलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे वाहनतळाची जागा बाधित झाल्यामुळे वाहन लावण्यासाठी जागेची समस्या निर्माण झाली.
ही बाब येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविराज तावरे (लाखे) यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी वाहन चालक मालकांच्या या समस्येची दखल घेत निरा-बारामती रस्त्यावरील नवीन बसस्थानकाच्या शेजारी पडीक, परंतू तीव्र उतार असलेली जागा होती. ती जागा स्वच्छ करून, मुरूम टाकून भरून घेतली. रोलिंग करून सदर जागा सपाट केली.
या ठिकाणी रविराज तावरे यांनी स्वतः वृक्षारोपण केले. झाडांच्या संरक्षणासाठी ट्रिगार्ड बसवले. इतकेच नाही तर वाहन चालकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक बसवले. परिसरात स्वच्छ राखण्यासाठी डसबीनची व्यवस्था करून चांगल्या पद्धतीचे वाहनतळ तयार करून दिले.
या वाहनतळाला तावरे यांच्या पुढाकारातून अजितदादा पवार वाहन चालक-मालक वाहतुक संघटना असे नाव देण्यात आले. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोसले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अमित तावरे यांच्या उपस्थितीत फलकाचे उद्घाटन करून नवीन जागेमध्ये वाहनतळ कार्यरत करण्यात आले.
या संघटनेच्या माध्यमातून माळेगावकरांना व परिसरातील प्रवाश्यांना रास्त दरात अगदी घरच्या प्रमाणे प्रामाणिक सेवा देण्यास तत्पर राहणार असल्याचे आश्वासन चालक-मालक यांनी दिले. योगायोगाने विरोधी पक्षनेते अजित पवार हे या रस्त्याने जात होते. तेव्हा रविराज तावरे यांनी त्यांना याची कल्पना दिली. तेव्हा अजितदादांनी काही क्षण तेथे थांबून भाडोत्री वाहनचालक, मालकांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या व तिळगूळही दिला.