वाईत नवीन दोन मजली सर्किट हॉऊसचे सुरु असलेल्या बांधकामावर २५ फुट उंचीवरुन बकेट खाली पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू
दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – वाईच्या शासकीय विश्रामगृह परिसरात नविन दोन मजली विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे, या बांधकामासाठी अंदाजे २५ फूट उंचीवर कॉंक्रिट करण्यासाठी खालून कच्चा माल वरती पोचविणाऱ्या बकेट लिफ्टचा दुर्दैवाने वायररोप तुटला आणि नागेवाडी येथील चंद्रकांत किसन राजपुरे या ४३ वर्षीय मजूराचा यामध्ये अंत झाला.
या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात करण्यात आली असून वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्यांचे सहकारी हवालदार धीरज यादव, मदन वरखडे, उमेश गहीण, रामदास कोळेकर यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई येथील विश्रामगृह परिसरात ३ कोटी रुपयांचे नवीन दोन मजली अद्ययावत विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे. कौशिक कान्हेरे या ठेकेदारामार्फत गेली सहा महिने याचे काम सुरू आहे.
या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सिमेंट कॉंक्रीट घेऊन जाणारी बकेट लिफ्ट असून या लिफ्टमधून राजपुरे व त्यांचे सहकारी वरच्या मजल्यावर निघाले. मात्र वायररोप तुटल्याने २५ ते ३० फूटावरून ही बकेट खाली पडली व त्यात राजपुरेंना गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुसऱ्या सहकाऱ्याने मात्र प्रसंगावधान राखून वायररोप तुटताना लोखंडी अॅंगलला पकडले. त्यामुळे ते वाचले. या घटनेचा अधिक तपास हवलदार रामदास पवार हे करीत आहेत.
चंद्रकांत राजपुरे यांच्यावर नागेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणी एक मुलगी असा परिवार आहे .