दौंड : महान्यूज लाईव्ह
श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आज दौंड शहरात एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. संभाजी भिडे दौंड शहरात येणार असल्याची वार्ता समजताच दौंड शहरातील बौद्ध संघटना आक्रमक झाल्या असून भिडेंना तीव्र विरोध दर्शवत संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
परिणामी शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवण्याची शक्यता निर्माण झाली असून दौंड पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका व शहर यांनी मंगळवारी (दि.१७) एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून शहरातील विठ्ठल मंदिरात सायंकाळी पाच वाजता संभाजी भिडे उपस्थित राहणार आहेत. तसे नियोजन हे संयोजकांनी केले असुन दौंड पोलीस व संबंधित प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले आहे.
मात्र दुसरीकडे संभाजी भिडे यांचे दौंड शहरात आगमन होणार असल्याची वार्ता समजताच शहरातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि बौद्ध संघटना आक्रमक झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, ऑल इंडिया दलित पॅंथर , भीम क्रांती सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदींसह विविध संघटनांनी भिडे यांच्या कार्यक्रमास तीव्र विरोध दर्शविला आहे.
संभाजी भिडे यांच्यावर सन २०१८ च्या भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल आहे. भिडे हे समाजात जातीय तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. पोलिसांनी संभाजी भिडे यांचा कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावू असा इशाराही या संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, त्यामुळे दौंड शहरात कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यात संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त राहीले आहेत. भिडे यांचे धारकरी आणि बौद्ध संघटना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दौंड पोलिसांची एक डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्था निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.