बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील बहुचर्चित सावकारी प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या नगरसेवक जयसिंह उर्फ बबलू देशमुख यांच्यासह नऊ जणांची बारामती सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
जिल्हा व सत्र न्यायालयाने १. जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, २. जयसिंग उर्फ बबलू देशमुख, ३.संजय कोंडीबा काटे, ४.विकास धनके, ५. मंगेश ओमासे, ६. प्रवीण गलिंदे, ७. हनुमंत गवळी, ८. संघर्ष गव्हाळे, ९. सनी उर्फ सुनील अवाळे यांची मुक्तता केली.
या नऊ जणांची भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३०६, ५०५, ३४ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३२, ३९, ४५ या गंभीर गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने, ॲड. डी. डी शिंदे, ॲड. विजयसिंह मोरे, ॲड. सचिन वाघ, ॲड. राजेंद्र काळे, ॲड. भार्गव पाटसकर, ॲड. डी. जे. माने यांनी काम पाहिले.
ही घटना सन २०२० मध्ये घडली होती. शहरातील व्यापारी प्रितम लेंगरेकर यांची आत्महत्या ही सावकारी जाचामुळे घडली अशी फिर्याद त्यांचा मुलगा प्रतिक लेंगरेकर यांनी शहर पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर बारामती पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
अर्थात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जाणीवपूर्वक काही जणांना यात समाविष्ठ केल्याची चर्चा शहरात होती. तसेच या प्रकरणात आणखीही काही बड्या लोकांची नावे होती, मात्र ती वगळली गेल्याचीही चर्चा रंगली होती. त्यामुळे हा गुन्हा आकसापोटी दाखल करण्यात आल्याचीही चर्चा त्यानंतर सुरू झाली होती.
तत्कालिन एका पोलिस अधिकाऱ्याने आपली जरब बसावी या हेतूने सावकारीविरोधात उघडलेल्या या मोहिमेत शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा गुन्ह्यामध्ये समावेश झाल्याने हे प्रकरण हायप्रोफाईल बनले होते. ज्याची राज्यात चर्चा झाली होती. त्यामुळे या नऊ जणांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सत्य पराजित नही होता अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.