सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरात प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रस्ते काटर व्यवस्था याचे काम चांगले झाले आहे. शहरातील प्रत्येक चौकात सुशोभिकरण झाले आहे. शहरात राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामामुळे इंदापूरचा चेहरामोहरा बदलला आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरातील शाहूनगर भागामध्ये ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात भरणे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते.
यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की,
राष्ट्रवादीच्या माध्यमातून इंदापूर शहरातील विकासकामांमध्ये प्रभागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. इंदापूर शहरातील नागरिकांना चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी नेहमीच आग्रही असते. यापूर्वी इंदापूर शहरामध्ये जवळपास सर्व ठिकाणी रस्ते व ड्रेनेज कामे पूर्णत्वास आली आहेत. त्याबरोबरच शहराच्या प्रत्येक चौकात सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे आपल्या शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
तहसीलदार इमारत, नगरपालिका इमारत, नवीन कोर्ट इमारत, किंवा आय टी आय कॉलेज ची इमारत असेल अशा सर्व नवीन इमारतींमुळे शहराला एक वेगळे रुप प्राप्त झाले आहे. दरम्यान संक्रांतीच्या सणानिमित्त महिलांना यावेळी आमदार दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांनी तिळगुळ दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.