रामभाऊ जगताप, सांगवी
बारामती-फलटण रस्त्याचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे.या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते.विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार संबंधितांनी दखल घेऊन अखेर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. तसेच अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावरील खड्डे इतके खोल आहेत की तात्पुरती डागडुजी केली तरी काही दिवसातच हे खड्डे जैसे थे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खड्डे बुजवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यात शनिवारी ( दि.७ ) विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे सायंकाळी कोल्हापूरकडे जाताना सांगवी येथे माळेगाव कारखान्याचे संचालक अनिल तावरे यांच्या निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिनशेठ सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,दुध संघाचे संचालक प्रकाशराव तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामतीहून सांगवीकडे येत असताना त्यांना या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा अनुभव आला. अजितदादांनी संबंधितांना रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामाबाबत माहिती घेताना या रस्त्यावरील खांडज पाटी, २२फाटा, शिरवली चौफुला, जरांडे वस्ती, सांगवी या ठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने डांबरीकरणाच्या साह्याने रविवारी ( दि.१५ ) खड्डे बुजविण्यात आले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.तसेच अनेक वाहनचालकांना कायमचे अपंगत्व आले आहे.