बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या विकासावर सातत्याने चर्चा होते, मात्र काल बारामती तालुक्यातील गुणवडी येथील विकासकामांच्या उदघाटनाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार हे तेथे आले होते. त्यावेळी एका जबाबदार व्यक्तीने अजितदादांच्या हातात एक कागद दिला आणि त्यातील ओळ न ओळ वाचल्यानंतर दादांच्या रागाचा पारा चढला.
अजितदादांना ज्या व्यक्तीने हा कागद दिला, ती व्यक्ती अजितदादांच्या मते जबाबदार व विश्वासार्ह असल्याने अजितदादांनी थेट हा कागदच सभेत वाचून दाखवला. सरकारी अधिकाऱ्यांच्या कामाचा हा पंचनामाच त्यातून मांडला गेला. लक्ष्य होते, भूमी अभिलेखचे.. मात्र फक्त दादा असल्यावरच अलर्ट मोडवर असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांसाठी हा कागद म्हणजे इशारा होता.
प्रशासकीय इमारतीत तहसीलदार, प्रांताधिकारी, सहायक निबंधक, दुय्यम निबंधक, कृषी, अभियांत्रिकी, नगररचना, भूमी अभिलेख, जलसंधारण आदी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज तालुक्यातून व इंदापूर तालुक्यातूनही शेतकरी व लाभार्थी येत असतात.
या कार्यालयांमधून विशिष्ठ झेरॉक्सच्या दुकानातूनच नकाशाची झेरॉक्स घेण्याचा आग्रह धरला जातो, त्या दुकानात ही झेरॉक्स ३०० रुपयांना असते, त्यामुळे यामागे नेमके काय षडयंत्र आहे? असा सवाल या व्यक्तीने यामध्ये नमूद केला होता.
सर्व्हे नंबरच्या नकाशासाठी मागेल ती रक्कम द्यावी लागते. सॉल्व्हन्सी मिळण्यासाठी काही हजारांची रक्कम मागितली जाते. वेगवेगळ्या कामांसाठी वेगळी मागणी होत असते. सुविधा केंद्रात पावती दिली जाते, त्यावर रक्कम मांडलेली नसते. शेकडो लोक येतात, माणसे बघून पैशाची मागणी केली जाते. शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. इतर खात्यातील अनुभव तर सांगायला गेलो, तर वेळ पुरणार नाही असे या व्यक्तीने नमूद केले होते.
त्याचा संदर्भ घेत दादा म्हणाले, यात कितपत तथ्य आहे? आम्ही काय मजा वाटते, म्हणून उत्तमातल्या उत्तम इमारती बांधत नाही. तुम्हाला सुविधा मिळाल्याच पाहिजे, पण सरकारी अधिकाऱ्यांनो, सेवक म्हणून काम करता, लोकांची कामे अशा पध्दतीने करणार असाल, तर मी सोडणार नाही. मी कधीच नियमाच्या बाहेर जाऊन काम करा असे सांगत नाही. उपमुख्यमंत्री असताना, आता विरोधी पक्षनेता असताना व आमदार असताना किंवा साधा नागरिक असतानाही हीच भूमिका माझी कायम आहे.
घटनेने, नियमाने, कायद्याने काम करा. अर्थात यातून जर एखाद्या अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर त्याचीही गय करणार नाही.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनो, त्रयस्थपणे माहिती घ्या..
यासंदर्भात अजित पवार म्हणाले, मला काय पाठीला डोळे नाहीत. मी हे असले खपवून घेणार नाही. सामान्यांना त्रास होणार असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करू. मात्र सगळेच येऊन तक्रारी करीत नाहीत. येथील वस्तुस्थिती माहिती करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या युवक, युवतीच्या कार्यकर्त्यांनी इथे काय घडते हे लक्षात आणून द्यावे, अधिकारी चुकीचे वागत असेल तर रितसर कारवाई करायला आम्ही कमी पडणार नाही. मात्र अधिकाऱ्यांची चांगले काम करूनही कोणी जाणीवपूर्वक बदनामी करीत असेल, तर त्यालाही सोडणार नाही. मी सांगितलेले काम केले नाही, म्हणून त्या अधिकाऱ्यावर डूख धरायचा, हेही चालणार नाही.