बारामती -महान्यूज लाईव्ह
आजारपण किंवा दुःखाच्या गोष्टी उगाळत बसण्याची पवार कुटुंबाला सवय नाही.. आज सकाळी सहा वाजल्यापासून विरोधी पक्षनेते अजित पवार ज्या उत्साहाने व सहजपणे बारामती व तालुक्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत होते, त्यावरून अजित पवार काल पुण्यात लिफ्टच्या अपघातातून बालंबाल बचावले असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र अजितदादांनी आपल्या
माणसांत बोलताना हा किस्सा सहजपणे सांगितला आणि म्हणाले, नाहीतर आज माझ्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला असता..!
अजित पवार यांनी पुण्यात लिफ्ट मध्ये अडकल्याचा हा किस्सा सांगितला आणि सर्वांनाच धक्का बसला, कारण अजितदादांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही, अथवा त्याचे काहीच दुःख वाटू दिले नाही. काल पुण्यात ते ज्या लिफ्टमध्ये होते, ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली आदळली.
अजित पवार हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली आणि काही क्षणात लिफ्ट चालू होऊन पुन्हा ती खालच्या बाजूला आदळली.
दादा पवईमाळ (तका. बारामती) येथील सभेत म्हणाले, लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो. नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती.
मात्र आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहावेना. म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगतो. असे दादा म्हणाले आणि उपस्थितांना मोठा धक्का बसला. अर्थात काल पुण्यात एवढी मोठी घटना घडूनही त्याची काहीच चर्चा नाही, अथवा त्यासंदर्भात दवाखान्यानेही काही स्पष्टीकरण दिलेले नाही, मात्र एकंदरीत पवार कुटुंबिय कोणतेच संकट अथवा दुःख उगाळत बसत नाहीत. आजारपण तर नाहीच नाही हा संबंध महाराष्ट्राला यापूर्वीचा अनुभव आहेच..!