राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : राज्य शासनाने संक्रातीच्या सणाच्या पूर्वी मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती तसे आदेशही प्रशासनाला दिले होते. मात्र शासनाचे हे मोफत धान्य रेशनिंग दुकानदारापर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे संक्रांतीच्या सणासुदीला शासनमान्य रेशन दुकानातून रेशन कार्डधारकांना रिकाम्या हाताने निराश होऊन माघारी जावे लागले. शासनाच्या या गैरकारभार रेशनिंग कार्ड धारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शासनाकडून केसरी, पिवळ्या रेशनिंग कार्डधारकांना मोफत धान्य वाटप केले जाते. मात्र काही दिवसांपासून हे मोफत धान्य बंद करण्यात आले होते. संक्रातीच्या तोंडावर हे मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. तसे आदेश हे प्रशासनाला देण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रेशनिंग दुकानात रेशनकार्ड धारकांनी मोफत धान्य वाटप होणार असल्याने संक्रात सण जवळ आल्याने धाव घेतली.
मात्र संक्रातीचे मोफत धान्य अद्याप आले नसल्याचे रेशनिंग दुकानदाराकडून सांगण्यात आले. परिणामी अनेक रेशनिंग कार्डधारकांना निराश होऊन रिकाम्या हाताने माघारी जावे लागली. ऐन मकरसंक्रांतीच्या सणाच्या तोंडावर शासनाच्या या ढिसाळ व नियोजनशुन्य कारभारावर शिधापत्रिकाधारकांनी संताप व्यक्त केला.
ऐन सणासुदीच्या दिवशीच ग्रामीण भागातील गोरगरीब रेशनिंग कार्डधारकांना शासनाच्या या मोफत धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. दरम्यान, याबाबत दौंड तहसील कार्यालयातील तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश भोंडवे म्हणाले की, धान्य वाटप निश्चित होणार आहे. दोन दिवसात धान्य दुकानात मोफत धान्य येईल.