सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील अवसरी येथे शेताच्या बांधाला टाकळीची झाडे लावली, त्यामुळे का्ंद्याच्या पिकाला अडचण येते या कारणावरून सख्ख्या शेजारी असलेल्या भावकीत बाया आणि माणसांची अशी झकपकांड लागली की, विचारूच नका.. आदल्या दिवशी शिवीगाळ, दमदाटी केली, अन दुसऱ्या दिवशी दगडांनी चेचून काढली माणसं..! पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह युट्यूब वर पाहू शकता.
यामध्ये दोन घटना घडल्या आहेत. एक घटना १० जानेवारी रोजी घडली असून गजेंद्र पेंढवळे याने शिवाजी पेंढवळे यांच्या सामाईक बांधावर टाकळीची झाडे लावली, त्यामुळे कांद्याचे नुकसान होत असल्याबाबत विचारणा केली म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद शिवाजी पेंढवळे यांनी दिली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी ही हाणामारी झाली. यामध्ये संध्या शिवाजी पेंढवळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गजेंद्र सोपान पडवळे, धनाजी गजेंद्र पेंडवळे, उर्मिला गजेद्र पेंडवळे, अनुसया धनाजी पेंडवळे (चौघेही रा. अवसरी, ता. इंदापूर) आणि अक्षय महादेव खबाले व अजय महादेव खबाले (दोघे रा. भाटनिमगाव ता. इंदापूर) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संध्या पेंढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संध्या या शेतात कांद्याच्या पिकात खुरपत असताना अवसरीतील चौघांनी शेतीच्या बांधाच्या कारणावरून दगडाने संध्या यांना बेदम मारले. त्या्ंचा आवाज ऐकून त्यांचे पती शिवाजी हे तेथे धावत आले असता त्यांनाही या सर्वांनी दगडाने मारहाण केली.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वीच चुलत्याने पुतण्याला थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
त्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला असतानाच आता इंदापूरातही असाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने यापुढे शेतीची भांडणे थेट लाईव्ह पाहता येणार आहेत, शिवाय पोलिसांनाही खरे कोणाची चूक आहे हेही समजणार आहे असे समजायला काही हरकत नाही.