पुणे – महान्यूज लाईव्ह
कोथरूड येथील स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रिडानगरीत झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेड तालुक्याचा शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.
शिवराजने महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजेतेपद पटकावले आणि कुस्तीशौकिनांनी अख्खे मैदान डोक्यावर घेतले. शिवराज गादी विभागातून अंतिम लढतीत उतरला होता. त्याने उपांत्य फेरीत हर्षवर्धन सादगीरला ८ विरुध्द २ अशा फरकाने चितपट केले.
तर दुसरीकडे महेंद्र गायकवाड हा माती विभागातून अंतिम लढतीत पात्र ठरला होता. त्याने उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. यानंतर महाराष्ट्र केसरी गदेसाठी महेंद्र व शिवराजमध्ये लढत झाली. दोघांमध्ये कडवी झुंज झाली, मात्र अखेर शिवराज हाच महाराष्ट्र केसरीचा दावेदार ठरला.
दोघांना मिळणार बक्षिसे..
शिवराजला या स्पर्धेतून रोख ५ लाख रुपये व महिंद्रा थार जीप मिळणार असून महेंद्रला अडीच लाख रुपये रोख व ट्रॅक्टर भेट मिळणार आहे.