पुणे – महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असा एक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये पुण्यात प्रसूती झाल्यानंतर अल्पवयीन पत्नीने पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या विचित्र घटनेने साऱ्यांच्याच अडचणी वाढवून ठेवल्या आहेत. आता नवरा तर कामाला लागलाच, शिवाय ज्या मंदिरात हे लग्न झाले, तेथे पुजारी असेल, त्याने लग्न लावून दिले असेल, तर तोही कामाला लागू शकतो असे चित्र दिसते.
यातील अल्पवयीन पत्नीने पुण्यातील ससून रुग्णालयात मुलीला जन्म दिला असून आता तिचे वय १७ वर्षे ६ महिने आहे. ती अल्पवयीन असून अल्पवयीन असताना प्रेमसंबंध निर्माण झाल्याने पतीने व तिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दौंड तालुक्यातीलच गावानजिकच्या मंदिरात लग्न केले. यासंदर्भात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी यासंदर्भात पोलिसांकडे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पतीविरोधात गुन्हा दाखल आहे.
आता वर्षभरानंतर तिने १४ जानेवारी २०२३ रोजी पोलिसांकडे फिर्याद दिली असून यामध्ये मी अल्पवयीन असताना माझे व माझ्या पतीचे प्रेमसंबंध होते, म्हणून दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मंदिरात लग्न केले व विभक्त राहू लागलो, यामध्ये शारीरीक संबंध प्रस्थापित होऊन आपल्याला दिवस गेल्याचे नमूद केले आहे.
आता पोलिसांनी आज (ता.१४) बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ च्या कलम ११ व १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार नागरगोजे करीत आहेत.