बारामती : महान्यूज लाईव्ह
आम्ही शोधतो आहोत महाराष्ट्रातील अतीशय बुद्धीमान अशी ४० मुले. या मुलांचे दहावीनंतरचे सर्व शिक्षण पुर्णपणे मोफत होईल. ज्या क्षेत्रात त्यांना करियर करायचे आहे, त्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी त्यांना दिली जाईल. आपल्या आसपास अशी मुले असतील कृपया कळवा, एका शैक्षणिक संस्थेने हे आवाहन केलेले आहे. या प्रकल्पाला व्यावसायिक स्वरुप येऊ नये यासाठी या संस्थेने आपले नाव कुठेही प्रसिद्ध केलेले नाही.
आपल्या आसपासही अशी मुले असतील, जी आता ७ ते १० या वर्गात शिकत असतील. कुणाला आर्थिक अडचण असेल, तर कुणाला योग्य मार्गदर्शनाची गरज असेल. अशी असंख्य हुशार मुले असतात, ज्यांना योग्य वयात योग्य संधी न मिळाल्याने ते आपल्या क्षमतेनुसार प्रगती करू शकत नाहीत. अशा मुलांपैकीच या वर्षी दहावीत शिकणाऱ्या ४० मुलांना ही संधी उपलब्ध होणार आहे. ७ ते ९ वीतील मुलांनाही स्कॉलरशीप आणि योग्य मार्गदर्शन दिले जाईल. आपणही या शोधात सहभागी होऊ शकता. आपल्या आसपास ७ ते १० या वर्गात शिकणारी अशी मुले असतील, ज्यांना आपल्या पुढील शिक्षणासाठी अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. तर कृपया आम्हाला कळवा. या मुलांना पुढील शिक्षण आणि करियरसाठी मदत करण्याची जबाबदारी आमची राहील.
आम्ही ज्यांच्या शोधात आहोत, त्यांच्यामध्ये ही वैशिष्ठे असावीत,
१. त्यांच्या वर्गात त्यांचा पहिल्या तिघात नंबर असायला हवा.
२. प्रामाणिकपणा आणि कष्ट घेण्याची तयारी हवी.
३. या मुलांपैकी ज्यांना आर्थिक दृष्ट्या पुढील शिक्षण घेण्यासाठी अडचण असेल, त्यांचा प्राधान्याने विचार होईल.
महाराष्ट्राचे हे सुपर फोर्टी भविष्यकाळात आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उज्जल करणार आहेत. तेव्हा यांच्या शोधाच्या मोहिमेत सामील व्हा. अशा मुलांची नावे, पत्ता आणि संपर्क क्रमांक ९८८१०९८१३८ या क्रमांकावर कळवा.