बारामती : महान्यूज लाईव्ह
“माझ्या शिक्षकांच्या अनुभवावरून मी एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो की कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान किंवा शिक्षणपद्धती ही एखाद्या समर्पित शिक्षकाला कधीही पर्याय ठरू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. श्रीराम गडकर यांच्यासारखे या महाविद्यालयातील त्यागी व समर्पित प्राध्यापक होय” असे प्रतिपादन बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व अधीस्वीकृती परिषदेचे (नॅकचे) सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित डॉ. श्रीराम इंदिरा यशवंत गडकर लिखित ‘कार्यमग्नता ..’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे हे होते.
आपल्या भाषणात डॉ. जगन्नाथ पाटील पुढे म्हणाले की, ” ‘कार्यमग्नता ..’ हे पुस्तक साहित्यकृती म्हणून महत्त्वाचं आहेच पण त्यासोबत ऐतिहासिक संदर्भसाधन म्हणूनही ते महत्त्वाचं आहे. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन संशोधन व ज्ञानविस्ताराच्या नोंदी जाणीवपूर्वक कशा जतन करून ठेवाव्यात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे या महाविद्यालयाची ‘बखर’ आहे व डॉ. गडकर हे ‘बखरकार’ आहेत.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भरत शिंदे म्हणाले की, “गुरुवार, दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीराम गडकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. आपला मित्र स्वतःच्या अगोदर सेवानिवृत्त होणार असल्यामुळे विभाग प्रमुख पदावर विराजमान होऊ शकणार नाही या उदात्त हेतूने मराठी विभाग प्रमुख पदाची जवाबदारी डॉ. श्रीराम गडकर यांनी डॉ. आनंदा गांगुर्डे यांच्याकडे सोपविली. विभाग प्रमुख पदासाठी कोर्टकचेरी, वादविवाद होणाऱ्या जमान्यात एक उत्तम आदर्श घालून दिला. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. डॉ. श्रीराम गडकर व डॉ. आनंदा गांगुर्डे यांचे मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.”
डॉ. श्रीराम गडकर यांच्या ‘दलित व दलितेतरांची कथा : एक अभ्यास’, ‘सुंदर प्रवास …’, ‘कार्यमग्नता ..’, या पुस्तकांच्या मुद्रणप्रतींना अंतिम रूप देण्यासाठी व युट्युब चॅनेल अद्ययावत करण्यासाठी अनेक आजी-माजी तंत्रस्नेही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मदत केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने शोण भोकरे व आकाश डेंगळे या दोन विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक सत्काराचा स्वीकार प्रमुख अतिथी डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या शुभहस्ते केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. श्रीराम गडकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ. संजय खिलारे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अमर भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, सहकारी प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
अक्षय जगताप, अभिराज वनशिव, राजेश मोरे, वैभव आटोळे, अहिल्या खताळ, नेहा वारगड, मयुरी भापकर, इ. विद्यार्थी स्वयंसेवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.