मुंबई – महान्यूज लाईव्ह
आता उठसूठ कोणाचेही दहा, पंधरा गुंठे किंवा दोन-पाच एकर मुदतीवर घेऊन त्याचे तुकडे पाडून मार्केटींग करायचे आणि कमाई करायची, तसेच ज्याचे घर विकायचे आहे, भाड्याने द्यायचे आहे, ते हेरून दलाली करायची हे आजवरचे एजंटांचे धंदे आता तितके सरळ राहणार नाहीत. अर्थात त्यांनाही कायदेशीर संरक्षण मिळेल.. मात्र त्यासाठी त्यांना महारेराची परिक्षा मात्र द्यावी लागेल आणि तर आणि तरच त्यांना इस्टेट एजंट होता येईल..!
१ मे २०२३ पासून या नव्या नियमाची सुरवात होणार असून रिअल इस्टेट एजंटांसाठी ही एकीकडे अडचणीची तर दुसरीकडे महासंधी देखील आहे. महाराष्ट्र रेराने यासंदर्भातील सूचना जारी केली आहे.
राज्यात सध्या ४० हजारांवर नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट आहेत. तर गावागावात, निमशहरी भागात तर अवैध व्यवसायाचा सुळसुळाट आहे. या साऱ्यांना एका नियमात बांधले जाणार आहे. त्यांच्यासाठी महारेराची परिक्षा बंधनकारक राहणार आहे.
रिअल इस्टेट एजंट व्यावसायिक दृष्टीने अधिक प्रगल्भ करण्यासाठी, त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ही परीक्षा महत्वाची ठरेलच, शिवाय त्यांना अधिकृतपणे एजंट म्हणून काम करता येईल. अर्थातच ते कायद्याच्या कचाट्यात येणार असल्याने त्यांना चुकीचे कामही करता येणार नाही, त्यांच्याकडून ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनाही कायमस्वरुपी बंदी अथवा त्यांच्यावर कठोर कारवाईही होऊ शकेल.
दरम्यान या परीक्षेचा अभ्यासही तयार करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यापासून ऑनलाईन, ऑफलाईन स्वरुपात प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. त्यामुळे जे एजंट म्हणून आज व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी ही संधीही आहे आणि बिकट वाटही..!