दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
शेंदुरजणे (ता वाई) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले आणि यात उपसरपंच व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या संदर्भात वाईच्या पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गावकीचा वाद किती गंभीर असतो याची जाणीव यानिमित्ताने अनेकांना झाली असेल..
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गावातील देविदास जगताप व इतरांनी एका कामासंदर्भात माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. यावरून ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच जयसिंग जगताप व देविदास जगताप यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाली होती.
त्यानंतर वाई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दुपारी देविदास जगताप इतरांनी या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गजाने जयसिंग व त्यांचा मुलगा प्रवीण जगताप यांना मारहाण केली. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत याबाबत तक्रार घेण्याचे काम सुरू होते. या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.