पुणे – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकीचे मोठे फॅड ग्रामीण भागातही सुरू झाले आहे. विशेषतः तरुण मंडळी, नव्याने पैसा कमविण्यास सुरवात केलेली मुले या बाजाराकडे आकर्षित झाली आहेत. मात्र यात धोका कायम आहे, हे माहिती असलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः गुंतवणूक करणे वेगळे आणि साखळी व्यवसायातून शेअर बाजारातील गुंतवणूक तर अधिकच रिस्क.. मुंढव्यातून आलेल्या या बातमीने अनेकांचे डोळे उघडतील ही अपेक्षा.
पुण्यातील मुंढवा भागात एकाच कुटुंबातील चौघांनी आपले आयुष्य संपवले. विष घेऊन दिपक पुंडलिक थोटे (वय ५९ वर्षे), इंदूमती दिपक थोटे (वय ४५), ऋषीकेश दिपक थोटे (वय २४ वर्षे) व समीक्षा दिपक थोटे (वय १६ वर्षे) या चौघांनी आत्महत्या केली.
शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसान झाल्यामुळे चहूबाजूंनी अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच हे कुटुंब केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. रात्री चपाती व भाजी असे जेवण करून हे कुटुंब झोपी गेले होते. मात्र स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धावाधाव केली आणि चौघांची आत्महत्या समोर आली. मुंढवा पोलिस या घटनेमागचे खरे कारण शोधत आहेत.