शिरूर महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उदघाटनाच्या निमित्ताने शिरूरमध्ये आलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर तोफांचा भडीमारच जणू केला. मात्र यातही त्यांनी गुणरत्न सदावर्तेंचे नाव न घेता व गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांची नावे न घेता अजितदादांनी नक्कल करीत असा ठोका टाकला की, सारी सभा हसतच राहीली.
आता कुठे गेला तो डंका? आणि ती चोट कुठे गेली? असा सवाल करीत अजितदादांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले, आमचे सरकार होते, तेव्हा कोरोनाचा काळ आला, त्या काळातही आम्ही लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. आरोग्याच्या बाबतीत तिजोरी माझ्याकडे होती, तेव्हाही कोठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली.
अगदी सारे बंद होते, एसटी बंद होती, त्या स्थितीतही २५० कोटी आम्ही पगारासाठी उपलब्ध करून दिले, आम्ही काही उपकार केला नाही, त्या कर्मचाऱ्यांचीही कच्चीबच्ची घरात होती ना? पण आम्ही सरळमार्गी आहोत. जे काही आहे, ते रोखठोक बोलतो. आमचा माणूस चुकला तरी त्याला आम्ही लगेच टोकतो, त्याची जागा दाखवून देतो. मात्र ही सरड्यासारखे रंग बदलणारी माणसे पहा.
त्यांचे सरकार आले तर मूग गिळून गप्प? आमचे सरकार असताना काही शहाणी आमदार तिथं जाऊन झोपत होती. आता ते आमदार एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, म्हणून तिकडे झोपायला का जात नाहीत? तो डंके की चोटपे कुठे गेला? ती डंकाही तिकडे आणि चोटही तिकडेच! आता एसटीच्या कामगारांचे पगार होत नाहीत, याला जबाबदार कोण? अशा शब्दांत अजितदादांनी विरोधकांना घेरले.