तब्बल २४ गुन्ह्यात तो पोलिसांना चकवा देत होता. पण ते म्हणतात ना कानुन के हाथ बहुत लंबे होते है,यवत पोलिसांनी अट्टल रोहीत्र चोराला केले गजाआड!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात रोहित्रांची चोरी करून तब्बल २४ गुन्ह्यात पोलिसांना चकमा देऊन फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास यवत पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शोध शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
सागर गोरख पवार (वय २५ रा.वाळकी ता.दौंड जि. पुणे मुळ रा. राहुरी रेल्वे स्टेशन जवळ जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सन २०२१ व सन २०२२ मध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये रोहीत्रे (डी.पी. ट्रान्सफार्मर) चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती.
यवत गुन्हे शोध पथकाने पुणे जिल्ह्यातील रोहीत्रे चोरीचे ४६ गुन्हे उघडकीस आणून ५ टोळ्या जेरबंद करून वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्यातील दत्ता शिंदे (रा.राहू ता.दौंड जि. पुणे) याच्या टोळीकडून २८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते, तेंव्हा पासून सागर पवार हा फरार झाला होता.
तो वाळकी (ता. दौंड जि. पुणे) येथे येणार असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने वाळकी येथे जाऊन फरार आरोपी सागर गोरख पवार यास गुरुवारी (दिनांक १२) ताब्यात घेतले.
त्याच्या टोळीतील इतर साथीदार दत्ता अशोक शिंदे (वय २८ वर्षे रा. राहु, थोरली विहीर ता. दौंड जि. पुणे), राज मच्छिंद्र वानखडे ( वय १९ वर्षे रा. केडगाव म्हसोबाचा मळा ता. दौंड, जि. पुणे. मुळ रा. बिडगाव ता. मुर्तुजापुर जि. अकोला), विशाल मनोहर सोनवणे ( वय ३० वर्षे रा. सासवड ता. पुरंदर, जि. पुणे), महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार( वय २९ वर्षे, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), लखन रमेश दोरके (वय २७ रा. समतानगर राहू ता. दौंड जि.पुणे), सचिन बबन बरडे (वय रा. राहू वाकण वस्ती ता. दौंड जि. पुणे मुळ रा. वैजापूर स्वस्तिक टॉकीज जवळ जि. औरंगाबाद),
इस्राक इर्शाद अली (वय ३८रा. शिक्रापूर चाकण रोड CNG पंपासमोर ता. शिरूर जि. पुणे, मुळ रा. कन्हारिया बुजुर्ग ता. महाराजगांज जि. लक्ष्मीपुर उत्तरप्रदेश (रिसिव्हर), निवृत्ती उर्फ मामा श्यामराव खळदकर (वय ३२ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे), अक्षय सूर्यकांत उर्फ सुरेश खळदकर ( वय २४ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे), सुरज प्रकाश जाधव (वय २३ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे), अर्जुन दिलीप बर्डे ( वय २० रा. राहूरी रेल्वे स्टेशन झोपडपट्टी ता. राहुरी जि. नगर, सध्या रा. वाडेबोलाई ता. हवेली जि. पुणे), विकास गौतम बनसोडे ( वय २३ रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे),
पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड( वय २३ रा. वडगाव रासाई ता. शिरूर जि. पुणे),लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार (वय २१ रा चिखली (रिसिव्हर)ता हवेली जि पुणे मु. रा गोंडा उत्तर प्रदेश) यांना या गुन्ह्याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली होती. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, होमगार्ड कमलेश भालेराव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.