दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे येथील सिंहगड रोडवरील स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या स्मारकाचे सामाजिक दायित्व मराठा देशा फौंडेशनला देण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आहे, त्यामुळे प्रशासन या प्रकाराकडे टाळाटाळ करत आहे, असा आरोप सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर यांनी केला आहे. तसे निवेदनही पासलकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
याबाबत माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे पहिले संस्थापक सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे पुणे येथील स्मारक संयुक्त प्रकला चालविण्याची मागणी ९ संस्थांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यामध्ये ७ संस्था अपात्र ठरल्या आहेत.
उर्वरित दोन संस्थात मराठा देशा फाऊंडेशन सर्व अटी, नियमात प्रथम क्रमांकावर आहे. असे असताना केवळ राजकीय दबावामुळे प्रशासन निर्णय घेत नाही.अशी तक्रार राजाभाऊ पासलकर यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतिकुल परिस्थितीत अठरापगड जातीच्या मावळ्यांसह तोलामोलाची साथ देऊन स्वराज्य रक्षणासाठी बलिदान देणारे वीर बाजी पासलकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पासलकर स्मारकाची उभारणी करण्यात आली.
त्यासाठी त्यांचे वंशज राजाभाऊ पासलकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. स्मारकाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. उर्वरित काम पुर्ण करता यावे तसेच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्मारकाचे दायित्व मराठा देशा फौंडेशनला देण्यात यावे अशी मागणी त्यांचे वंशज राजाभाऊ पासलकर, अविनाश पासलकर, लालासाहेब पासलकर, संजय पासलकर, द. स. पोळेकर, रोहित नलावडे आदींनी केली आहे.
दरम्यान, सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर तसेच अठरापगड जातीच्या मावळ्यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना साकडे घालूनही चार महिन्यांत याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने पासलकर आक्रमक झाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनी लवकर निर्णय न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजाभाऊ पासलकर यांनी दिला आहे.