दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई – येथील जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन शनिवारी (दि१४ रोजी) सकाळी ११ वाजता होणार आहे. येथून वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्याचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे साताऱ्याची पायपीट आता थांबणार आहे.
या न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा साताऱ्याचे पालक न्यायमूर्ती संदीप शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा साताऱ्याचे पालक न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ व वाई वकील संघाचे अध्यक्ष संजय खडसरे यांनी केले आहे.
वाई येथे जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालय झाल्याने दुर्गम कांदाटी खोऱ्यापासून महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील नागरिकांची सोय वाई या मध्यवर्ती ठिकाणी सोय होणार आहे. त्यांचा सातारा येथील न्यायालयात जाण्याचा मोठा त्रास कमी होणार आहे.