दौलतराव पिसाळ- महान्यूज लाईव्ह
कथित भ्रष्टाचारप्रकरणात बावधन (ता. वाई) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कारभाराविरोधात सुनील व्यंकट कदम व अन्य १३ सभासदांनी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी सहसचिव संदीप आनंदराव राऊत यास निलंबित करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या लेखी आश्वासनानंतर सभासदांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. मनोहर माळी यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाई तालुक्यात सहकारी संस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सोसायटीच्या कारभाराची चौकशी करणे, संस्थेवर प्रशासक नेमावा व अन्य मागण्यासाठी म्हणून सुनील व्यंकटराव कदम व अन्य १३ सभासदांनी सोसायटीच्या कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण सुरू केले होते.
आज बुधवार (ता.११) जिल्हा उपनिबंधक श्री. माळी सहाय्यक निबंधक जे. टी. खामकर व सहकार विभागाचे अधिकारी यांनी बावधन येथे उपोषण स्थळी भेट देऊन सभासदांच्या मागण्यांची माहिती घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी संस्थेच्या सन २०२०-२१ च्या शासकीय लेखापरिक्षणाबाबत संस्थेने एक महिन्याच्या आत विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी. संस्थेच्या कर्जदार, सभासद नसताना ज्यांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान रक्कम संस्थेच्या सचिवांनी बेकायदेशीररित्या वर्ग केली व संस्थेची व शासनाची फसवणूक केली. याबाबत संस्थेच्या सचिव व संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व सहाय्यक निबंधक, वाई यांना लेखापरिक्षकांनी कळविल्याप्रमाणे कारवाई करावी असे आदेश देण्यात आले.
तसेच महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत विकास सोसायटीच्या सर्व लाभार्थीची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संस्थेच्या सन २०२०-२१ या कालावधीच्या शासकीय लेखापरिक्षणामध्ये आढळून आलेल्या अनियमितता व अपहार याबाबत कायद्यानुसार चौकशीचे काम सुरू असून सदरील चौकशी १५ दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्यास कळविले आहे, असे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधक यांनी दिले.
त्यामुळे सभासदांनी उपोषण मागे घेतले असल्याची माहिती सुनील कदम, प्रकाश यदू पिसाळ, प्रकाश महादेव कदम, दिलीप शंकर दाभाडे, धनंजय शहाजी पिसाळ, अविनाश महादेव भोसले, किसन महादेव भोसले, बाळकृष्ण रघुनाथ पिसाळ, तेजस दिलीप मांढरे, किसन आप्पा कचरे, सखाराम शंकर कचरे, रमेश महादेव पिसाळ, सचिन आप्पासाहेब भोसले व ग्रामपंचायत सदस्य विवेक भोसले यांनी पत्रकारांना दिली.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, विक्रम पिसाळ, चंद्रकांत भोसले, विक्रम वाघ, दिगंबर रासकर, तुषार पिसाळ, संदीप पिसाळ, सूरज कदम, भास्कर जाधव, कुंभार, संतोष ननावरे आदी उपस्थित होते.