राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड: दौंड येथे सुरू झालेल्या आठव्या कृषी प्रदर्शनास राज्यातील भाजपचे मंत्री, आमदार व राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची उपस्थिती पहायला मिळाली, मात्र खुद्द दौंडचेच भाजपचे आमदार राहुल कुल हे उपस्थित नसल्याने त्यांनी या कार्यक्रमास पाठ फिरवली की काय अशी चर्चा सुरू झाली.
दरम्यान या कृषी प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र, आमदारांचा मला फोन आला होता. त्यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत असे सांगून वेळ सावरुन घेतली. मात्र या कार्यक्रमाठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आमदार कुल यांच्या अनुपस्थितीमुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दौंड येथे आयोजित केलेल्या १० ते १५ जानेवारीपर्यंत आठव्या कृषी प्रदर्शन सोहळ्याचे मंगळवारी (दि.१०) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.
या कृषी प्रदर्शन सोहळ्याला दौंड ,शिरूर, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा ह्या तालुक्यांसह जिल्ह्यातील शेतकरी आले. या कृषी प्रदर्शन सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वासुदेव काळे यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्याचे अनेक मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी कौतुक केले.
मात्र या कृषी प्रदर्शन सोहळ्याला दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अनुपस्थित होते. आमदार कुल यांच्या प्रमुख समर्थकांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजपमध्ये आमदार कुल, वासुदेव काळे असे दोन गट आहेत काय अशी कुजबुज या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.
याबाबत थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आले. यावर बावनकुळे म्हणाले की, आमदारांचा मला फोन आला होता. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. मी ही या कार्यक्रमास येईल हे निश्चित नव्हते, सध्या विधानपरिषद निवडणुका असल्याने अनेक नियोजित कार्यक्रम होते,
मात्र भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कृषी प्रदर्शन भरवले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमाल व उत्पादन महत्व प्राप्त होणार आहे. पिक पाणी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक शेतकरी योजना, हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या साठी व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हे कृषी प्रदर्शन महत्त्वाचे आहे.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यासाठी हे कृषी प्रदर्शन एक आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी या कृषी प्रदर्शन सोहळ्याला उपस्थित होण्याचा निर्णय घेतला असे बावनकुळे यांनी सांगून वेळ सावरून नेली.