बारामती : महान्यूज लाईव्ह
मोरगाव येथील कऱ्हा नदीच्या पात्रात सापडत असलेल्या ८ लाख वर्षापूर्वीच्या राखेचा पुरातत्वीय ठेवा जतन करणे गरजेचे असून यासाठी पुरातत्व खात्याशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले आहे. मोरगाव येथील सुरेश खोपडे यांच्या कुडाच्या शाळेचे व्यवस्थापक घनश्याम केळकर यांनी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांना यासंदर्भात पत्र दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाम पोटरेही उपस्थित होते.
८ लाख वर्षापूर्वी इंडोनेशिया येथे ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. त्यावेळी या ज्वालामुखीतून उडालेली राख जगाच्या खुप मोठ्या भुभागावर पसरली होती. काळाच्या ओघात फार थोड्या ठिकाणी या राखेचे अस्तित्व राहिलेले आहे. त्यातील दोन ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथील कुकडी नदीच्या पात्रात आणि मोरगाव येथील कऱ्हा नदीच्या पात्रातच सध्या या राखेचे अस्तित्व आढळते. याबाबत पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने विस्तृत्व संशोधन केलेले आहे.
मोरगाव येथील सुरेश खोपडे यांच्या कुडाच्या शाळेत पुरातत्व खोदकामाबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. पांडुरंग साबळे यांनी मार्गदर्शन केले. याचवेळी त्यांनी या राखेबाबत माहिती दिली. तसेच कऱ्हा नदीच्या पात्रात प्रत्यक्ष या राखेचे अस्तित्व कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना दाखवून दिले. याचवेळी त्यांनी या अत्यंत महत्वाच्या पुरातत्वीय राखेचे जतन करण्याची गरज बोलून दाखवली.
यामुळे सुरेश खोपडे यांच्या कुडाच्या शाळेच्या वतीने हा पुरातत्वीय ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. या संदर्भातच प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली असून परिसरातील जागरुक नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.