सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : गेल्या वीस वर्षांपासून वैदवाडी – कर्दनवाडी ते मानकरवाडी फक्त पाच – सहा कि.मी.असणा-या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राज्यकर्त्यांकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही असे मत नागरिकांचे झाले. अखेर या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावातील नागरिकांचा भावना अनावर झाल्या. आणि नागरिकांनी एकत्र येत आता मागे हटायचं नाही..आता रस्ता दुरुस्ती केल्याशिवाय गप्प बसायचं नाही , असा निर्धार करून नागरिकांनी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवत आंदोलनाचे हत्यार उपसले.आणि नागरिकांनी आज सकाळी दहा वाजता इंदापूर – बारामती राज्य रस्त्यावर चिखली फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
याबाबत परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैदवाडी (लहिरोबानगर) , कर्दनवाडी, नलवडेवस्ती, मोहितेवाडी, मानकरवाडी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या पाच ते सहा किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या वीस वर्षांपूर्वी झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची कसलीही दुरुस्ती झाली नाही. या रस्त्याची खडी उचकटली असून रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.
लासुर्णे हे गाव बारा वाड्यांचे प्रमुख केंद्र आहे. आठवडे बाजारासाठी त्याचप्रमाणे शाळेत जाण्यासाठी नागरिक व विद्यार्थी याच मुख्य रस्त्याने जात आहेत. इंदापूर, बारामतीला शिक्षणासाठी याच रस्त्याने जाणारे विद्यार्थी, शेती कामासाठी त्याचप्रमाणे दूध व्यवसायासाठी याच रस्त्याने शेतकरी वर्ग जात आहे.
या रस्त्याची दुरुस्ती हवी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा विनंती केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी नागरिकांनी एकत्रित येत बैठक घेतली. आता मागे हटायचं नाही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भांडायचं..असा निर्धार करत नागरिकांनी आज रास्ता रोको चा निर्णय घेतला आहे.