सातारा – महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाचा मोठा आदर्श घालून दिला. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील २९ शाळकरी मुलींना सायकली पुरवल्या. त्यामुळे पायी चालत जाणाऱ्या शाळकरी मुलींनाही हुरूप आला आहे.
केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागायचा. मुलांची होणारी गैरसोय केसुर्डी गावचे सरपंच गणेश ढमाळ यांच्या लक्षात आली, मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत आणि शाळे पर्यंतचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी ढमाळ यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीने सायकल बँक हा उपक्रम सुरू केला.
या शाळकरी मुलींना पुरविण्यात आलेल्या सायकली, त्यांचे या ठिकाणचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे राहणार असून त्यानंतर गावातून नायगाव अथवा इतरत्र जाणाऱ्या मुलींकडे ही सायकल हस्तांतरीत होईल. थोडक्यात याचा लाभ या लाभार्थ्याकडून त्या लाभार्थ्याकडे असाच होणार आहे.
गणेश ढमाळ म्हणाले, नायगाव ते केसुर्डी हे अडीच किलोमीटरचे अंतर मुलांना पायी चालत जावे लागते. त्यामुळे त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. मुलांना शाळेत वेळेवर जाता यावे म्हणून ग्रामपंचायत केसुर्डी व ओरिएंटल कंपनी यांच्या विद्यमाने नायगाव शाळेत शिक्षण घेणाऱ्या गावातील सर्व मुली व मुलांना या सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपसरपंच आकाश खडसरे, सदस्या सुरेखा ढमाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक किरण शिंदे, मुख्याध्यापक रमेश यादव, नायगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकरे, दादासाहेब ढमाळ, माजी उपसरपंच आनंद ढमाळ, गिरजोबा शेंडगे, नवनाथ ढमाळ, निलेश कोळपे, दशरथ जाधव, अनिकेत येलगुडे, शरद ढमाळ, उत्तम ढमाळ आदींसह इतरही उपस्थित होते.