रामभाऊ जगताप : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : शिवरायांचे 19 अंगरक्षक मुस्लिम होते. दुसरीकडे मिर्झाराजे जयसिंग हा हिंदू राजपूत सेनापती स्वराज्य संपवायला आला होता हा इतिहास आहे. त्या मिर्झाराजेच्या वेढ्यात घुसून शिलेदार कुडतोजी गुजर यांनी जे धाडस केले, तसेच दत्ताजीराव शिंदे यांनी केले. पाया पडतो सोडा असे म्हणाले नाहीत. रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढले असा गौरव खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला. तसेच मराठा सैन्य म्हणजे मराठी बोलणारे. सर्व जाती धर्माला सामावून घेणारे, असेही त्यांनी स्पष्टपणे मांडले.
येथील सोमेश्वर पॅलेसमध्ये श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानच्या वतीने रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे सरकार यांच्या 262 व्या स्मृतिदिनानिमित्त ‘शिंदे सरकार स्नेहमेळावा’ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शशिकांत शिंदे होते. याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी होळकर, प्रमोद काकडे, सुभाष शिंदे, उद्योजक आर. एन. शिंदे, संभाजीराजे शिंदे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, संत ज्ञानेश्वर यांना उच्च कुळ असल्याचे सर्टिफिकेट आणायला पैठण येथे जावे लागले, तर शिवाजी महाराज यांना राजस्थानच्या सिसोदिया वंशजशी संबंध जोडावे लागले हा इतिहास आहे. महादजी शिंदे यांना दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी होती, पण ती जागा छत्रपतींची हे ते विसरले नाहीत.
शशिकांत शिंदे म्हणाले, इतिहासावर बोलणं अवघड झालं आहे, पण बोलल्याशिवाय रहावत नाही. संभाजी महाराज यांना कुणी काय उपमा द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते कुणाच्या हृदयात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ते आमच्या ह्रदयात आहेत. शिवरायांवरील अलिकडचे चित्रपट बघितले आहेत. जुना इतिहास बदलण्याचा कुणी प्रयत्न केला असला तरी लोकांच्या मनातील स्थान कुणीही काढून घेऊ शकत नाही.
पानिपत या हिंदी सिनेमामध्ये शिंदे फक्त बचेंगे तो और लडेंगे या वाक्यापुरतेच आहेत. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. म्हणून आता आपला इतिहास आपणच जपला पाहिजे. शिवरायांचे स्वराज्य उभारताना साथ देणारा शिंदे घराणा ग्वाल्हेर, राजस्थान, दिल्ली असे देशभर विखुरला आहे, तो एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. सध्या मुख्यमंत्री शिंदे आहेत त्यांनी जर महादजी शिंदे यांच्या स्मारकासाठी निधी दिला तर महादजी शिंदे व शिंदे परिवाराचा यांचा सन्मान होईल,असे आवाहनही त्यांनी केले.
उद्योजक संजय शिंदे, महेश शिंदे, हेमंत शिंदे, निलेश शिंदे, उन्मेश शिंदे आदींनी संयोजन केले. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. युवराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास शिंदे यांनी आभार मानले.
रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे शौर्य पुरस्कार शहीद अशोक कामठे यांना मरणोत्तर देण्यात आला. तसेच करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे, वेबसिरीज अभिनेते भरत शिंदे, राज्य कर निरीक्षक मंगेश शिंदे, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, हवामान तज्ञ बापूसाहेब शिंदे, व्याख्याते गणेश शिंदे, डेअरीचालक रणजित दत्तात्रय शिंदे, तिरंगा स्कूलचे रणजित पोपट शिंदे, उद्योजक अजित शिंदे, पृथ्वीराज शिंदे, जनार्दन शिंदे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.