भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आघाडी सरकारवर टीका! दौंडला कृषी प्रदर्शनला सुरुवात!
राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
ज्यांची गेली पंधरा पंधरा वर्षापासून राज्यात सत्ता आहे त्यांनी केवळ बारामती शहराचा शच विकास केला, बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नाही,असा टोला विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
शिवसेनेचे नेते म्हणून घेणारे आणि जेलमध्ये मुक्काम करून आलेले संजय राऊत यांनी सरकारवर सकाळ ते संध्याकाळपासून उठसूट टोमणे मारण्यापेक्षा आमच्या सरकारकडे विकास कामे करण्यासाठी मागणी करावी, असा प्रतिटोला ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना लगावला.
दरम्यान, दौंड येथे आजपासून ( मंगळवार दि. १०) सुरू झालेल्या आठव्या कृषी प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र स्थापनेपासून साठ वर्षाच्या कालावधीत तब्बल पन्नास वर्षे सध्या विरोधात असल्यांच्या हाती सत्ता होती.
या ५० वर्षाच्या सत्तेच्या कालावधीत किती शेतकरी सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी कामे केली, सत्ता ही साध्य नाही तर शेवटच्या व्यक्तींचे भले करण्याचे साधन आहे, सत्ता ही कोणावर उपकार करण्यासाठी नाही तर सत्ता ही विकास करण्यासाठी आहे.केवळ कंत्राटदारांचा विकासासाठी सत्ता नाही.
बारामतीचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कृषिमंत्री शरद पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. त्यांनी केवळ बारामती शहरातच विकास केला बारामती तालुक्यातील अनेक गावे दुष्काळग्रस्त असून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
मात्र केंद्र आणि राज्य सरकारवर जनता खुश आहे त्यांना हे आपले सरकार असे वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामाचे शेतकरी कौतुक करीत आहेत, मोदी सरकारने राबवलेल्या शेतकरी धोरणांचं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजनांचा लाभ दिला जात आहे, कोरोना महामारीच्या काळातही मोदी सरकारने जगाला मदत केली आहे, या महामारीच्या काळात सरकारने आपले स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून, लस उपलब्ध करून नागरिकांना मास्क मुक्त केले आहे.
त्यामुळे देशातील आणि राज्यातील जनता ही भाजप सोबत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात संपूर्ण जागा भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, विरोधकांना उमेदवार ही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून या महाराष्ट्राला लाख दोन लाख कोटी कसे मिळतील कुठल्या विकासाची गरज आहे, मुंबईला कोणती गरज आहे ते ४० वर्ष विकास का करू शकले नाही ते पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे करीत आहे, त्यामुळे हे दानवेंना झोंबले आहे असुन मुंबई बद्दल दानवे यांना काही घेणेदेणे नाही.
शिंदे गट – कवाडे गट युती समाधान.!
ज्यांना ज्यांचे विचार पटतात ते निवडणूकित एकत्र येतात,शिंदे गट व कवाडे गट यांची युती झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. कवाडे यांचा त्यागाचा इतिहास आहे, आंबेडकर चौक त्यांचं काम चांगले आहे, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्यांचे अभिनंदनच आहे ..
शिंदे यांनी विचार करूनच युती केली असेल याचा नक्कीच जोगेंद्र कावाडे यांना फायदा होईल. असेही ते बावनकुळे म्हणाले. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भाजपचे नेते बाबा जाधवराव, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे दादा फराटे, गोविंद फराटे, गणेश जगताप, ज्ञानेश्वर शेळके, नवनाथ साळुंखे आदी उपस्थित होते.