दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
तुम्ही घरी आला की मला माझा बापूराव घरी आल्यासारखा वाटतो… बनुबाई सांगायच्या आणि पोलिसांना अगदी भरून यायचे.. या बनुबाई कोण? तर २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात भुईंज येथील भिरडाची वाडी येथील रहिवासी असलेले पोलिस अधिकारी बापूराव धुरगुडे शहीद झाले, त्यांच्या त्या मातोश्री..!
बापूराव धुरगुडे यांचा सन्मान राखताना भुईंज पोलिसांनी त्यांच्या घरी नियमित भेट देऊन त्यांच्या मातोश्री बनुबाई यांची विचारपूस करण्याची परंपरा कायम ठेवली. मागील वर्षी बनुबाई देखील हे जग सोडून गेल्या..
बनुबाईंचे ते शब्द मात्र पोलिसांच्या मनात कायमचे कोरले गेले. त्याच बनुबाई हे जग सोडून गेल्यानंतरही पोलिसांची परंपरा कायम राहीली. त्यांच्या वर्षश्राध्दाच्या निमित्ताने मग पोलिसांनी त्यांनी आदरांजली वाहिली. भुईंजचे सहाय्यक निरिक्षक आशिष कांबळे यांनी सातारा जिल्हा पोलिसांचे वतीने आदरांजली वाहीली. त्यावेळी धुरगुडे कुटुंबियांचे डोळे पाणावले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते अतुल जाधवराव, भुईंज पोलिस स्टेशनचे अतुल आवळे, सचिन नलवडे, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहीते व शहीद बापुराव धुरगुडे यांचे बंधु बाजीराव धुरगुडे, सुशांत धुरगुडे, भाजपा नेते गणपतराव धुरगुडे आदी मान्यवर हजर होते.