पुणे – महान्यूज लाईव्ह
सिंहगड रस्त्यावरील खाऊगल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चोप देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करून ते बक्षिसही देण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच सिंहगड रस्त्यावर रात्रीच्या वेळी कोयता उगारून दिसेल त्याला मारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलाची दहशत स्थानिकांनी व व्यावसायिकांनी घेतली होती. त्याचा नंगानाच सुरू असतानाच कोणीतरी पोलिसांना कळवले.
अक्षय इंगवले व धनंजय पाटील त्याचवेळी त्या परिसरात होते. माहिती मिळताच अगदी डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच ते तेथे पोचले आणि त्यांनी कशाचीही पर्वा न करता त्या कोयतेखोराला बेदम चोप दिला. त्याच ठिकाणी त्याची दहशत मोडून काढताना त्यालाही दहशत बसेल असाच मार दिल्याने लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
दुसऱ्या दिवसापासून पुण्यातील विविध संस्था्ंचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी या दोघांचा सत्कार करीत होते. पोलिस दलानेही त्याची दखल घेत तब्बल २५ हजारांचे प्रत्येकी पारितोषिक देत त्यांचा उचित गौरव केला. पोलिस दलात २५ हजारांचे पारितोषिक म्हणजे सर्वोच्च सन्मान मानला जातोय, त्यामुळेच हे दोघे पोलिस भाऊ सध्या पुणे पोलिसांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.