ही कहाणी आहे.. कामात कशाला आलीय लाज? या वर्गातील महिलेची.. बुंदेलखंडातील कटनी रेल्वे स्टेशनवर दररोज ४५ किलोमीटरचा प्रवास करून संध्या येते.. ६५ कुली तेथे आहेत..मात्र त्यामध्ये संध्या एकमेव महिला आहे.. नव्हे ती देशातील पहिली महिला कुली आहे…
ती एकटीच या कुलीचे काम करते. सन २०१५ पर्यंत तिच्या आयुष्यात सामान्य जगणे होते. तिचा पती मजूरी करीत होता. मात्र पती, मुलांसह तिचा संसार अगदी सुखासमाधानाने सुरू होता. मात्र अचानक तिच्या नवऱ्याचे सन २०१६ मध्ये निधन झाले आणि तिच्या संसाराला दृष्ट लागली.
काही दिवस दुःखाचे निघून गेले. मग जगण्याची चिंता वाढली. पाठीमागे पोरांना व बायकोला सोडून नवरा तर गेला, मात्र आता तिला आणखी खचून चालणार नव्हते, मग तिने मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातही तिने रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करण्याचा निर्णय घेतला.
समाज काय म्हणतो याची पर्वा न करता तिने हे काम सुरू केले आणि सन २०१७ पासून ती आजअखेर काम करतेच आहे. आता तिचे काम ये- जा करणाऱ्या नियमित प्रवाशांसह स्थानकावरील सर्वांसाठीच सामान्य, नेहमीचे बनले आहे.
कुली कामासाठी ती दररोज घरापासून ४५ किलोमीटरचे अंतर पार करून कटनी रेल्वे स्थानकावर पोचते. तिला तिच्या मुलांना शिकवून त्यांचे भविष्य उज्वल करायचे आहे आणि त्यासाठी पडेल ती मेहनत करण्याची तिची तयारी आहे… जय हो संध्या मारावी..!