पुणे – महान्युज लाईव्ह
पैशाचा मोह काही केल्या कोणालाच सुटत नाही. मग त्यात एखादा व्यापारी कसा मागे राहील? पुण्यातील एका व्यापाऱ्याला बिटकॉईन देतो म्हणून तब्बल १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची फसवणूक करून पसार झालेला टोळीचा प्रमुख पोलिसांनी तब्बल १० महिने त्याच्या मागावर राहून पकडला. पोलिसांनी मुख्य सूत्रधार प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल (वय – ३४, सध्या रा. डी/१४, द मिस्ट, इंदीरानगर, दहीवली, ता. कर्जत, जि. रायगड,) आणि त्याचा साथीदार शब्बीर हद्रदीश शेख (वय – ४१, रा. निर्मलनगर सन थॉमस चर्चसमोर, मीरा रोड पूर्व), या दोघांना अटक केली आहे, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, कुलदीप नारायण कदम (वय – ३६, रा. शनिवार पेठ, पुणे) या व्यापाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. कदम याच्या कंपनीचे कार्यालय शिवाजीनगर येथे आहे. संशयित आरोपी मुकुल याने त्याच्याकडील बिटकॉईनची विक्री करणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी रोड, पुणे), मंगेश कदम (स्नेह सागर सोसा. गोखलेनगर, पुणे) या दोघांना कदम याच्याकडे पाठवले होते. या दोघांनी कदम याच्यासमवेत काही बैठका घेऊन व्यवहाराची बोलणी केली. त्यानंतर कदम यांना ३ बीटकॉईन देतो असे सांगून चौथा आरोपी शब्बीर शेख याने त्याचा साथीदार रणजित जरनैल सिंह याच्या आयसीआयसीआय बॅंकेतील खात्यावर १९ लाख ७० हजार ८८६ रुपये भरण्याची सूचना केली. कदम यांनी ते पैसे भरले, मात्र मुकूल याने बिटकॉईन काही दिले नाहीत.
त्यानंतर कदम यांनी पैसे माघारी मागितले, तर सर्व आरोपींनी कदम यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून कदम याने फसवणूकीची फिर्याद पोलिसांकडे दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पोलिसांनी प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल याच्यासह रंजित जरनैल सिंह (वय – ३७, धंदा – व्यवसाय, रा. हेमिटेज शंग्रीला, पश्चिम द्रूतगर्ती मार्ग, मीरा रोड, भाईंदर ठाणे), शब्बीर शेख (वय – ४१, धंदा-व्यवसाय, रा. ए विंग, निर्मलनगर ५०२, सन थॉमस चर्चसमोर, मीरा रोड), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी रोड, पुणे, व मंगेश कदम, (रा. स्नेह सागर सोसायटी गोखलेनगर, पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
पोलिसांनी तपासाला सुरवात केली ,मात्र मुकूल हा सतत नावे बदलून व मोबाईल क्रमांक बदलून त्याची ठिकाणे सातत्याने बदलत होता. त्यामुळे त्याचा सुगावा लागत नव्हता. मात्र पोलिस अंमलदार आदेश चलवादी यांनी तांत्रिक आधाराने त्याचे छायाचित्र मिळवले. त्यानंतर मग त्याचा विद्यमान पत्ता समजल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सायबर पथकातील सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, रूपेश वाघमारे, आदेश चलवादी यांना त्यास पकडण्यासाठी सापळा रचण्याची सूचना केली.
त्यानंतर या सर्वांनी सापळा रचला. मुकूल तेथे आल्यानंतर रुपेश वाघमारे यांनी त्याच्यावर झेप घेत त्याला ताब्यात घेतले. त्याला काही कळण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या घराचा ताबा घेतला व मुकूल याच्याकडून ७ मोबाईल, १० सिमकार्ड, वेगवेगळया बॅकांची १८ खात्यांची पासबुके, वेगवेगळया बॅकांचे ८ डेबिट कार्ड पोलिसांनी जप्त केली. ही कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सायबर पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, अर्जुन कुडाळकर, रुचिका जमदाडे आदींच्या पथकाने केली.