हैदराबाद – महान्यूज लाईव्ह
अखिल भारतीय अॅमेच्युअर रेसलिंग असोसिएशनच्या वतीने हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत कटकेने ९ वर्षानंतर महाराष्ट्राला हिंदकेसरीचा किताब मिळवून दिला.
हैदराबाद येथील या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढतीपर्यंत पोचताना सोमावीरने महाराष्ट्राच्याच तीनदा महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय चौधरीला पराभूत केले होते. तर अभिजीत कटकेला पहिल्या फेरीतील विजयानंतर दुसऱ्या फेरीत पुढची चाल मिळाली आणि तो अंतिम लढतीत पोचला.
अंतिम लढतीत श्वास रोखून धरायला लावणारा थरार पाहायला मिळेल अशी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अभिजीत कटके याने सोमावीरला कसलीच संधी दिली नाही. एकतर्फी लढत करीत अभिजीतने सोमावीरचा पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या फेरीत ५ गुण घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीत सोमावीर हा नकारात्मक कुस्ती करू लागला, तेव्हा पंचांनी त्याला ताकिद देत ३० सेकंदात गुण घेण्याची सूचना दिली. मात्र ३० सेकंदात तो अभिजीतकडून एकही गुण वसूल करू शकला नाही. अभिजीतच्या अभेद्य बचावामुळे अभिजीतला पंचांनी एक गुण दिला शेवटच्या क्षणी सोमावीर आक्रमक झाला, मात्र त्याला फारसे काही करता आले नाही.
अभिजीत कटके सन २०१७ च्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी असून त्याने हिंदकेसरीला गवसणी घातल्याने कुस्ती क्षेत्रातील मल्लांनी रविवारीच दिवाळी साजरी केली. अभिजीत हा पुण्यातील शिवरामदादा तालमीत सराव करतो. अभिजीतने यापूर्वी महाराष्ट्र केसरी व भारत केसरी हे दोन किताब मिळवले आहेत.