मुंबई – महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, खजिनदारपदी संजय बजाज व सहसचिवपदी संतोष बोबडे यांची निवड झाली असून माजी अध्यक्ष अजय शिर्के व रियाज बागवान यांनी या निवडीमध्ये सहकार्य केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
या निवडीनंतर रोहित पवार यांनी ट्विट करून आभार मानले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी बरीच मोठी उलथापालथ झाली आणि महाराष्ट्रातल्या क्रिकेटवर पुन्हा एकदा पवारांची पॉवर चालली हेच दिसून आले.
आज अध्यक्षपदी निवड होताच रोहित पवार यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. रोहित पवार यांचा क्रिकेट हा अतिशय आवडीचा खेळ आहे. जिल्हा परीषद सदस्य होताच त्यांनी क्रिकेटच्या अनेक स्पर्धा घेतल्या, अजूनही ते स्पर्धांना प्रोत्साहन देत आहेत.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये पवारसाहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे मार्गदर्शन, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा तसेच एमसीए च्या अनेक माजी अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांचीही यामध्ये मोलाची मदत झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. क्रिकेट माझा नेहमीच आवडीचा खेळ राहीला आहे. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.