जेजूरी – महान्यूज लाईव्ह
इतिहासात काका मला वाचवा अशी आर्त हाक पेशवाईच्या भाऊगर्दीत कोणीतरी दिलेली अनेकांना स्मरणात असेल.. आज पुरंदर तालुक्यातही असाच प्रकार घडला. इथे फक्त काका मला मारु नका असे म्हणण्याची वेळ पुतण्यावर आली होती..
फक्त तीन गुंठे क्षेत्राच्या वादात आज पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे माणूसकी मरता मरता थोडक्यात वाचली. पुतण्याच्या जमीनीत अतिक्रमण केलेल्या चुलत्याला विचारणा करण्यास गेलेल्या पुतण्याच्या अंगावर रॉकेल ओतून चुलत्याने पुतण्यालाच पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह च्या युट्यूब फेसबुक पेजवर पाहू शकता.
या प्रकरणी जेजूरी पोलिसांनी चुलता भास्कर त्रिंबक भुजबळ याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात शारदा नानासाहेब भुजबळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
शारदा भुजबळ यांचा मुलगा स्वप्नील व आरोपी भास्कर भुजबळ हे नात्याने चुलते -पुतणे आहेत. भास्कर भुजबळ याने पुतण्या स्वप्नील भुजबळ याच्या शेतात अतिक्रमण करून उसाची लागवड केली होती.
स्वप्नीलला या जमीनीवरील उसाची तोड सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तो आईला सोबत घेऊन शेतात गेला होता. तेव्हा तेथे विचारणा करण्यासाठी गेलेल्या पुतण्याचा राग आल्याने चुलता भास्कर याने घरातून रॉकेलची बाटली घेतली. टेंभा तयार केला, त्यावर रॉकेल ओतून टेंभा पेटवला व टेंभा आणि बाटली घेऊनच भास्कर हा शेतात आला.
त्याने पळत जाऊन पुतण्या थांबला होता, त्याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला थेट पेटवून दिले. सुदैवाने स्वप्नीलच्या पाठीवर स्कूलबॅग होती, त्यानेच पेट घेतला. त्यानंतर तेथे उपस्थितांनी त्याला तेथून पळून जाण्यास सांगितले. त्यानंतर स्वप्नील पळू लागल्यानंतरही भास्कर हा त्याचा पाठलाग करू लागला आणि त्याने फेकून टेंभा स्वप्नीलच्या अंगावर मारला.
या घटनेत शारदा भुजबळ याही जखमी झाल्या आहेत. जेजूरी पोलिसांनी या प्रकरणी भास्कर याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास फौजदार कुंडलिक गावडे करीत आहेत.