दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील दत्त मंदीरासमोरून चढण चढत एक कंटेनर सातारा बाजूकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पाठीमागे सरकत सरकत मागून येणाऱ्या कंटेनरच्या डिझेल टाकीवर आदळला, त्यामुळे दोन्हीही कंटेनरने अचानक पेट घेतला.
या घटनेत दोन्ही कंटेनर चे मोठे नुकसान झाले आहे. दोन्हीही कंटेनर चालकांनी प्रसंग पाहून बाहेर उड्या मारल्याने दैव बलवत्तर म्हणूनच ते सुखरुप बचावले.
या घटनेची माहिती खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश इंगळे, भुईंज महामार्ग मदत केंद्राचे फौजदार घनवट यांना समजताच हवालदार संकपाळ, डेरे, कचरे, जाधव, गायकवाड तर खंडाळा पोलिस ठाण्याचे हवालदार दिघे, भोईटे, फरांदे, सणस आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
दोन्ही ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी वाई नगरपालिकेच्या अग्नीशामक बंब बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
खंडाळा आणी महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक वेळे गावच्या हद्दीत असणाऱ्या खंबाटकी बोगद्याद्वारे वळवल्याने तुंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.