कर्जत – महान्यूज लाईव्ह
पोलिसांचा कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि न्यायाच्या प्रक्रियेत वेग असेल, तर काय घडते?
कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात संपूर्ण राज्याला संदेश देणारी शिक्षा श्रीगोंद्याच्या सत्र न्यायालयाने सुनावली.. जी ऐकून आरोपी देखील शहारला असेल…! श्रीगोंद्याच्या कोर्टाने आरोपी छबू याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मरेपर्यंत 2 जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी श्रीगोंदा सत्र न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.विशेष म्हणजे श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी एका वर्षातच हा निकाल दिला आहे.
छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा.चिंचोली काळदात) असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. छब्याने अल्पवयीन असलेल्या आकांक्षा (नाव बदलले आहे) चे तोंड दाबून तिला घरात ओढत नेले आणि तोंड दाबूनच जीवे मारीन, तुझ्या आईबापावर अॅट्रॉसिटी करेन आणि त्यांनाही जीवे मारीन अशी धमकी देत ती घाबरल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
दुसरी आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास उर्फ बबन आखाडे याने या घटनेनंतर प्रकरण मिटवून घ्या, नाहीतर अॅट्रॉसिटी करू अशी धमकी दिली होती. मात्र त्यानंतरही मुलीच्या आईने न घाबरता २ मार्च २०२२ रोजी फिर्याद दिली आणि त्यानुसार कर्जत पोलिसांनी तातडीने पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तपास अधिकारी फौजदार अमरजित मोरे, महादेव कोहक यांनी या घटनेत पाठपुरावा व सखोल तपास केला.
पोलिसांनी बांधलेली अप्रतिम केस, ज्यामध्ये पुराव्यानिशी व कोणत्याही त्रुटी न ठेवता पोलिसांनी कोर्टातही पाठपुरावा केला. सरकारी वकील संगीता ढगे व अॅड. सुमित पाटील यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद यामुळे दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी सरकारी बाजूचा युक्तीवाद ग्राह्य मानला.
आरोपी छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे यास अत्याचाराच्या प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, दहा हजार रुपये दंड आणि पोस्को कायद्याखाली लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायद्यान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अर्थात दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. तर दुसरा आरोपी नामे सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे याची सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष सुटका केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार अमरजित मोरे, महादेव कोहक, सुनील माळशखरे, श्याम जाधव, गोवर्धन कदम, महिला पोलीस आशा खामकर यांच्या पथकाने केलेल्या एका तपासाचा शेवट कानून के हात बहोत लंबे होते है या वाक्यापर्यंत झाला.
हे प्रकरण कसे पुढे आले होते?
अल्पवयीन मुलीच्या या प्रकरणाची उघडकीस येण्याचीही अजब कहाणी आहे. कर्जत शहरात एका धार्मिक कार्यक्रमात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ‘कुणावर कसलाही काही अन्याय झाला, तर न घाबरता मला भेटा. आपण न्याय मिळवून देऊ’ असे आवाहन केले होते. त्या आवाहनामुळे अल्पवयीन मुलीच्या आईला धीर आला आणि तिने ही घटना पोलिस निरीक्षकांच्या कानावर घातली. पोलीस निरीक्षक यादव यांनी ही घटना गांभिर्याने घेतली आणि या अन्यायाबाबत फिर्यादीने २ महिन्यानंतर तक्रार दिली. सत्र न्यायालयाने त्यावर सुयोग्य न्याय दिला.