सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
ही घटना आहे, इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर येथील..! पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील कौठळी येथून लोणीदेवकर येथील एमआयडीसी परिसरात राहण्यासाठी आलेल्या तात्यासाहेब चितारे यांना काल संध्याकाळी लॉटरी लागली.. लॉटरीच म्हणायची, कारण तीनशे ग्राहकांमध्ये नेमकी तात्यालाच दुचाकी लागणे हा देखील नियतीचाच खेळ म्हणायचा..! नियतीने दुचाकीची गरज नेमकी कोणाला आहे हे बरोबर ओळखले असावे…! काल रात्री तात्याच्या घरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली..!
लोणीदेवकर येथील एमडी कलेक्शन येथे संचालक रवींद्र ढुके यांनी दिवाळीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कपडे खरेदीवर हमखास भेट ठेवली होती. ही हमखास भेट प्रत्येक ग्राहकांना मिळाली होती. मात्र त्याबरोबरच एक मोठे बक्षिस म्हणून दुचाकी देखील येथे नशीबवान ग्राहकाची वाट पाहत होती.
काल लोणीदेवकर येथील एमडी कलेक्शन या कापडाच्या शोरुमसमोरच हा लकी ड्रॉ ठेवला होता. संध्याकाळची वेळ होती. एकच दुचाकी आणि तीनशे जण नशीब आजमावणारे.. निकाल काय लागेल हे माहिती असतानाही उत्सुकतेपोटी सारे थांबले होते. याच गर्दीत मात्र गर्दीपासून काहीशा अंतरावर तात्यासाहेब चितारे हा लोणी देवकरच्या कंपनीत जाणारा कामगारही आपल्या आठ वर्षाच्या मुलासह थांबला होता.
एका चिमुकल्याने लकी ड्रॉ सुरू करताच एक चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठी दुचाकी कोणाला मिळणार याचे नाव कोरलेले होते. चिठ्ठी काढली.. नाव वाचले गेले.. बसलेले सगळेच पाठीमागे पाहू लागले. कारण त्यांच्यापैकी कोणालाच ती दुचाकी मिळणार नव्हती.. मात्र तात्यासाहेब चितारे या नावाला ती दुचाकी लागली होती.. हे तर काही अंतरावर थांबलेल्या तात्यालाही माहिती नव्हते. तेवढ्यात गावातीलच तात्यासाहेबाचा मित्र अत्यंतिक आनंदाने तात्याला शोधत तेथपर्यंत पोचला..
अरे, तात्या..तुलाच दुचाकी लागलीय.. चल पळ.. असे म्हणत त्याने ओढतच तात्यासाहेबांना कार्यक्रमस्थळी नेले आणि तात्यासाहेबाचा आनंद गगनात मावेना.. गावातील लोकांनाही या घटनेचा आनंद झाला. कारण तात्यासाहेबाचे गाव कौठळी.. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी कंपनीत कामाला लागलेला तात्या कौठळी सोडून लोणीदेवकर येथे राहण्यास आला. भाडोत्री घरात राहणारा तात्या दररोज कंपनीत सायकलवर ये-जा करतो. त्यामुळे अगदी योग्य व गरजवंत व्यक्तीला दुचाकी लागली अशाच प्रतिक्रिया येऊ लागल्या.
इकडे तात्यासाहेबांनी घरी आपल्या कारभारणीला फोन केला. तर अविश्वसनीय आनंदात बायकोने तात्याला कशाला चेष्टा करताय असा प्रश्न केला, त्यावर खरंच आपल्याला दुचाकी लागलीय असे सांगताच त्याच्या कुटुंबियांचा आनंदही गगनात मावेना. रात्री तात्यासाहेबांनी अगदी आनंदात घरासमोर दुचाकी नेली. तिचे पूजन केले.. कधी नव्हे ते नेहमीपेक्षा अधिक पेढे घेऊन ते परिसरात वाटले.. आज सकाळीही तात्याशी बोलताना त्याच्या बोलण्यातून हा आनंद जाणवत होताच..!
रविंद्र ढुके, माजी प्राचार्य व संचालक एमडी कलेक्शन, लोणीदेवकर – व्यवसाय करताना केवळ नफा हे गणित सुरवातीपासून ठेवलेच नाही, त्यामुळे गावात दुकान असले, तरी त्याचा लाभ हा आमच्यावर प्रेम करणाऱ्या ग्राहकांनाही मिळाला पाहिजे, म्हणून सरसकट भेट योजना आम्ही ठेवली होती. परवडले नाही, तरी दुचाकी भेट ही योजना राबवायचीच हेही ठरवले आणि एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की, ही भेट गरजवंताला मिळाली. या कार्यक्रमाच्या आनंदी क्षणाची सातत्याने आठवण येत राहील.