दौलतराव पिसाळ -महान्यूज लाईव्ह
वाई– तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये सर्वात अधिक उलाढाल असलेली आर्थिक संस्था बावधन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कारभारात झालेल्या आर्थिक घोटाळ्यांबाबत न्याय मिळत नसल्याने सभासदांच्या न्यायहक्कासाठी संस्थेचे प्रमुख सभासद सोमवार (दि. ९) जानेवारीपासून सोसायटीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत, अशी माहिती सुनील व्यंकटराव कदम व अन्य १४ सभासदांनी दिली आहे.
सातारा येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक, वाईतील सहाय्यक निबंधक, वाईचे तहसीलदार, पोलीस स्टेशन, विकास सोसायटीचे चेअरमन व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावधन विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक उलाढाल जवळपास १० कोटी रूपये इतकी आहे.
त्यापैकी एक कोटी रूपये इतक्या रकमेचा अपहार या संस्थेतून झालेला आहे. हाच अपहार वैधानिक लेखापरिक्षण अहवालात उघडकीस आलेला आहे. सन २०२०-२१ व सन २०२१-२२ च्या वार्षिक ताळेबंद अहवालानुसार सभासदांना लाभांश मिळालेला नाही.
संस्थेच्या सभासद नसताना महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देऊन शासनाची फसवणूक केली आहे. याचप्रकारे चार मयत कर्जदारांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून लाखो रूपयांच्या रकमा उचललेल्या आहेत. याप्रकारे अनेक बोगस कर्ज प्रकरणे केली गेली आहेत. त्यातून लाखो रकमेचा अपहार झालेला आहे.
सन २०२१-२२ चे वैधानिक लेखापरिक्षण अहवालानुसार ताळेबंद व नफा तोटा पत्रक शासकीय आँडीट झाले असताना चुकीचा व सभासदांची दिशाभूल करणारा वार्षिक अहवाल विद्यमान संचालक मंडळाने वार्षिक सभेपुढे ठेवून आर्थिक घोटाळा झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चौकशी अधिका-यांना २ महिन्यांचा कालावधी दिलेला असूनही त्याबाबत अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामध्ये मुद्दामहून दिरंगाई करण्यात येत आहे. तसेच आर्थिक घोटाळा टाळण्यासाठी शासनस्तरावर याबाबीची दखल घेतली जात नाही. सदरच्या सोसायटीवर त्वरीत प्रशासक नेमावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.
निवेदनावर सुनील कदम, प्रकाश यदू पिसाळ, प्रकाश महादेव कदम, दिलीप शंकर दाभाडे, धनंजय शहाजी पिसाळ, अविनाश महादेव भोसले, किसन महादेव भोसले, बाळकृष्ण रघुनाथ पिसाळ, तेजस दिलीप मांढरे, किसन आप्पा कचरे, सखाराम शंकर कचरे, रमेश महादेव पिसाळ, सचिन आप्पासाहेब भोसले, ग्रामपंचायत सदस्य विवेक वसंत भोसले आदींच्या सह्या आहेत.