दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खुटबाव येथील साळोबावस्ती येथे झालेल्या एका अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारच्या धडकेने हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघाताने दिल्लीच्या कंझावाला रोडची आठवण करून दिली, कारण पाठीमागून धडक दिल्यानंतर कारनं दोघांना काही अंतरावर फरफटत नेलं..
खुटबावकडून यवतकडे भरधाव निघालेल्या कारमुळे हा अपघात झाला. या घटनेत मित्राच्या नातवाच्या वाढदिवसाला निघालेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असलेल्या ज्ञानदेव लाला खंकाळ (वय ६८ वर्षे) व ज्ञानदेव गुलाब शेळके (वय ४२ वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला.
खंकाळ व शेळके हे त्यांचे मित्र असलेल्या नारायण चव्हाण यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी चालले होते. मात्र त्यांना हा कार्यक्रम आपल्या आयु्ष्यातील शेवटचा कार्यक्रम असेल याची सुतरामही कल्पना नसावी. मात्र कारचालकाने चालवलेल्या भरधाव कारमुळे त्यांना कसलीच संधी मिळाली नाही.
एमएच१२यूयू २९९९ या कारने रस्त्यावरून चालत निघालेल्या शेळके व खंकाळ यांना पाठीमागून जोराची धडक दिली व तसेच फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार अजिंक्य दौंडकर आदींनी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी आकाश ज्ञानदेव खंकाळ यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आकाश अनिल जगताप याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.