नाशिक – महान्यूज लाईव्ह
विद्युत रोहित्र बंद पडले, तर ते दुरूस्त करण्याचे काम महावितरणचे.. मात्र आजही शेतकऱ्यांना स्वतःच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो.. मुळात अगोदर वायरमन आढेवेढे घेतो.. मग शाखा अभियंता.. मग कधी पुढाऱ्याचा आलाच फोन, तर दुरूस्तीच्या ठिकाणी वेटींग असल्याचं कारण पुढं केलं जातं.. जोपर्यंत शेतकरी मालपाणी गोळा करीत नाहीत, तोवर हे काम सुरूच राहतं.. तोवर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची राखरांगोळी होते.. यांना मात्र काहीच त्याचं देणेघेणं नसतं.. म्हणूनच गरज असतानाही परवाच्या संपात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडं पाठ फिरवली..
आता तर नाशिकच्या ग्राहक मंचाने दिलेला आदेश महावितरणसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. वीज नियामक आयोगाने कधीकाळी जर ४८ तासांत विद्युत रोहित्र दुरूस्त करून दिले नाही, तर त्या तासाला ३० रुपयांप्रमाणे दिवसाला १२०० रुपये द्यावेत असा एक दंडक घालून दिला होता. त्याचा फारसा कोणी उपयोग करीत नाही. शेतकरी संघटनेने मात्र मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांना यासंदर्भात जागे केले, आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खायदे गावातील शेतकरी प्रा. कौतिक पवार यांनी मात्र महावितरणला अस्मान दाखवले. घटना पाच वर्षांपूर्वीची. मात्र चिकाटीने पाठपुरावा करीत नियमाचा आधार घेत पवार यांनी लढा दिला आणि आपली पॉवर दाखवून दिली.
त्यांच्या शेतात वीजपुरवठा करणारे विद्युत रोहित्र पाच वर्षापूर्वी म्हणजे जून २०१७ मध्ये नादुरुस्त झाले. मग त्यांनी गावातील वायरमनला कळवले. सुरवातीला तोंडी कळवल्यानंतर दाद मिळेना, मग त्यांनी लेखी कळवले. त्यानंतर शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, मंडल, परिमंडल कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. मात्र त्यांना कोणीच दाद देईना.
मग त्यांनी ग्राहक पंचायतीकडे दाद मागितली. ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय ग्राहक मंचाकडे पाठविण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांच्या वतीने अॅड. कल्याणी कदम यांनी युक्तीवाद करीत पवार यांची बाजू मांडली व नियमाचा आधारही समजावून सांगितला.
त्यानंतर मात्र जिल्हा ग्राहक मंचाने पवार यांच्या बाजूने निकाल देताना ५७२ दिवसांची ६ लाख ८६ हजार रुपयांची भरपाई पवार यांना देण्याचा व जोपर्यंत ही रक्कम दिली जात नाही, तोवर ९ टक्के व्याजही आकारून ही भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलींद सोनवणे, प्रेरणा कुलकर्णी, सचिन शिंपी यांच्या त्रिसदस्यीय मंचाने हा निकाल दिला.