दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
लिंब ( ता. सातारा) येथील आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आणि सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सर्जेराव सावंत यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली.
या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी कोरेगाव येथे सापळा रचून रोहन सुनील शिंदे (वय-१९) व ओंकार आनंदराव सोनवणे (वय-२० दोघेही रा. लिंब) यांना कोरेगाव येथील गारवा हॉटेल मधून ताब्यात घेण्यात आले.
१ जानेवारी रोजी रात्री ९. ४५ च्या सुमारास लिंब, ता. सातारा येथील चतुर्बेट गावच्या हद्दीत चतुर्बेट ते बारा मोटाच्या विहिरीकडे जाणार्या रस्त्यावर जितेंद्र सर्जेराव सावंत यांच्यावर हा हल्ला झाला होता.
सावंत यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जितेंद्र सावंत यांच्या बंधूंनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
सावंत हे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा तालुक्यातील कट्टर समर्थक आहेत. सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून त्यांनी यापूर्वी कामकाज केले आहे. त्यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी लिंब गावामध्ये तणावाचे वातावरण होते.
घटनेच्या दिवसापासून हल्लेखोर फरार झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजीत घोडके यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वीच्या काही घटना व तांत्रिक तपासावरून पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेतले.