ज्ञानेश्वर रायते, बारामती.
वाहनाचा विमा झिरो डीप, थर्ड पार्टी अशा स्वरुपाचा तुम्ही दरवर्षी उतरवत असालच, आता आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीने नवी पध्दत अंमलात आणली आहे. तुम्ही जशा प्रकारे वाहन चालवत असाल, म्हणजे तुमचा वाहन वापरण्याचा जसा प्रकार असेल, त्याच प्रकारे तुम्हाला विम्याचा हप्ता आकारला जाणार आहे.
आतापर्यंत विम्याची पध्दत ही वाहन किती वर्षांचे आहे, त्याची स्थिती कशी आहे, यावर त्याचा हप्ता ठरत होता, म्हणजे अजूनही तसाच ठरतो. मात्र आता तसे होणार नाही. विमा उतरवलेले वाहन तुम्ही वर्षात कसे चालवले, त्यावर पे हाऊ यू यूज प्लॅन
नुसार त्याचा विमा हप्ता ठरणार आहे.
म्हणजेच दोन व्यक्तींनी एकाच दिवशी एकाच मॉडेलचे वाहन खरेदी केले असेल, तर एक व्यक्ती वर्षात अगदी दोन हजार किलोमीटर एवढेच वाहन चालवत असेल व त्याचवेळी दुसरी व्यक्ती मात्र अतिशय रफ वाहन चालवून ते वर्षभरात ३० हजार किलोमीटर चालवत असेल, तर जो व्यक्ती २ हजार किलोमीटर चालवतो, तो कमी धोकादायक श्रेणीनुसार त्याचा कमी रकमेचा हप्ता व जो व्यक्ती त्याचा वाहनाचा सर्वाधिक वापर करीत असेल, त्याला अधिक रकमेचा हप्ता असे गणित असणार आहे. टेलिमॅटिक्स डिजीटल तंत्राच्या आधारे ओडोमीटर व जीपीएसच्या आधारे या विम्याचे गणित ठरेल.
आयसीआयसीआय लोंबार्ड ही कंपनी पे यू आणि पे हाऊ यू यूज प्लॅन ( पीएचवाययू) या दोन पध्दतीची विमा पध्दत बाजारात आणत आहे, त्याची माहिती बाळासाहेब मगदूम यांनी बारामतीत बोलताना दिली. एआय़ (कृत्रिम बुध्दीमत्तेच्या) तंत्राचा वापर करून अधिक विश्वासार्ह वर्तन आधारीत विमा आता सर्व ग्राहकांना पसंतीला उतरेल असा विश्वास असल्याचे मगदूम यांनी सांगितले. पेयू प्रकारात विमाधारक वाहनमालकाला किलोमीटर श्रेणीमधून विमा हप्ता निवडता येईल आणि पीएचवाययू श्रेणीत विम्याचा हप्ता हा तुमचे ड्रायव्हिंग कसे आहे, वर्षभरात तुम्ही वाहन कसे चालवले यावर ठरणार आहे.